मुंबई । Mumbai
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती आणि मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधकांमध्ये प्रचंड संभ्रम (Confusion) असून, ती ‘महाकन्फ्युज आघाडी’ असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळावर निशाणा साधला. “मविआचे हे शिष्टमंडळ तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आलेले आहे,” असे ते म्हणाले. ते म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज आणि राज्याचा सुरू असलेला विकास पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय पाहिल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता महायुतीलाच कामाची पोचपावती देईल. त्यामुळे समोर पराभव दिसत असल्यामुळेच त्यांना तक्रारी सुचत आहेत, असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना, ती ‘महाविकास आघाडी’ नसून ‘महाकन्फ्युज आघाडी’ असल्याचे म्हटले. “यांच्यात एवढे कन्फ्यूजन आहे की, कोण काय बोलते हे काहीच समजत नाही. कोणाचा कोणाशी पायपोस नाही. त्यामुळे हे कन्फ्यूज लोक एकत्र आले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा-केव्हा महाविकास आघाडीला विजय मिळाला, तेव्हा त्यांनी कधीच तक्रारींचा पाढा वाचला नाही. मात्र पराभव झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोग आणि न्यायालयांसह सर्वांवरच आरोप केले.
“आत्ताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते रडीचा डाव खेळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आले आहेत,” असा आरोप शिंदे यांनी केला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि ती काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या व लोकाभिमुख योजना राबवणाऱ्या महायुती सरकारच्या मागे उभी राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “विरोधक कितीही एकत्र आले तरी महायुती आगामी निवडणुकांत प्रचंड यश मिळवेल आणि विजय मिळवेल,” असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या एकत्र येण्याला फारसे महत्त्व दिले नाही.




