Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याबंगळुरूत आज एकता बैठक

बंगळुरूत आज एकता बैठक

बंगळुरू । वृत्तसंस्था

मोदी सरकार आणि भाजपविरोधात विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांची महत्त्वाची दोन दिवसीय महाबैठक आजपासून (दि.17-18) कर्नाटकातील बंगळुरू येथे होत आहे. पाटण्याच्या बैठकीनंतर बंगळुरूत होणार्‍या बैठकीला विरोधी पक्षांचा प्रतिसाद वाढला आहे.

- Advertisement -

या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, जदयू, राजद, नॅशनल कॉन्फरन्स आदी 24 विरोधी पक्ष हजेरी लावणार आहेत. 17 जुलैस सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली सरकारविरोधात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात संसदेत पाठिंबा देण्याची आम आदमी पक्षाची मागणी काँग्रेसने अखेर मान्य केली आहे. त्यामुळे बैठकीनिमित्त काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील संघर्ष टळणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फूटीनंतरसुद्धा विरोधी पक्षांची एकजूट अधिक मजबूत होईल, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात 23 जूनला पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची पहिली महाबैठक झाली होती. बैठकीला देशातील 15 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. आजपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या महाबैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बंगरूळूतील बैठकीला महत्त्व आले आहे.

बैठकीत काँग्रेस संसदीय मंडळाच्या नेत्या सोनिया गांधीदेखील सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर या राज्यांतील 274 जागांच्या वाटपावर विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. या राज्यांतील जागा वाटपात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जागावाटपाबाबत काँग्रेस लवचिक भूमिका घेईल, असे स्पष्ट केले आहे. तरीही उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील जागांवर काँग्रेसशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत.

बंगळुरूतील बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणती भूमिका घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटणातील बैठकीला शरद पवारांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल होते. आता त्यांनी एनडीएसोबत हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार आहेत. त्यापैकी खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

आआपाला काँग्रेसचे पाठबळ

बंगळूरू येथे उद्या सोमवारपासून सुरू होणार्‍या विरोधी पक्षांच्या दोन दिवसीय बैठकीआधी दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणणार्‍या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध करण्याचा अधिकृत निर्णय काँग्रेसने आज घेतला. तशी घोषणा पक्षाचे महासचिव केसी वेणूगोपाल यांनी केली. काँग्रेसने केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध न केल्यास आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर राहणार नाही, असे पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. मात्र आता काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने उद्या बंगळूरूतील बैठकीला केजरीवाल हजर राहण्याची शक्यता आहे.

स्नेहभोजनाला ममतांची अनुपस्थिती

विरोधी पक्षांच्या उद्या सुरू होणार्‍या बैठकीनिमित्त रात्री आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनुपस्थित राहणार आहेत. गुडघ्याच्या दुखापतीने ममता त्रस्त आहेत. त्यांच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 18 जुलैच्या बैठकीस मात्र त्या हजर राहणार आहेत.

तीन कार्यगट

विरोधी महाआघाडीचे संयोजक म्हणून नितीशकुमार यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. बेंगळुरूत होणार्‍या बैठकीत किमान तीन कार्यगट तयार करण्यावर विरोधी पक्षांचा भर असेल. पहिल्या गटाकडे भाजपविरुद्ध एक किमान समान कार्यक्रम तयार करणे आणि समान मुद्दे शोधण्याची जबाबदारी राहील. दुसरा कार्यगट राज्या-राज्यांतील आघाड्यांची ढोबळ रूपरेषा तयार करेल. प्रादेशिक पक्षांसोबतची ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल का? तेही ठरवले जाणार आहे. भाजपविरोधात विरोधकांचा एकच उमेदवार कसा उभा करायचा हा मुद्दा मुख्य चर्चेचा असेल. तिसरा कार्यगट पुढील महिन्यात ऑगस्टपासून विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त सभा घेण्यासाठी संभाव्य तारखांवर काम करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या