जामखेड । तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे तीन अज्ञात चोरट्यांनी वयोवृद्ध दांम्पत्यावर चाकू व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेत चोरट्यांनी गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने लंपास केले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही महिन्यातली दुसरी घटना आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही घटना घडली. खरात वाडी शिवारातील शेतात सेवक कोंडीबा गोरे आणि त्यांची पत्नी तोळाबाई गोरे हे घरासमोरील पडवीत झोपले होते. त्यावेळी अंदाजे २२ ते २५ वयोगटातील तीन अज्ञात चोरटे तेथे आले व घराची चावी मागू लागले. चावी शोधत असताना आरोपींनी सेवक गोरे यांच्या तोंडावर चाकूने वार केला आणि गळ्यातील बदाम हिसकावून घेतला.
यानंतर आरोपींनी तोळाबाई गोरे यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या तोंडावर, हातावर व पाठीवर दगडाने मारहाण केली आणि गळ्यातील डोरले तसेच कानातील झुबे काढून घेतले. पळून जाताना आरोपींनी पुन्हा सेवक गोरे यांच्या हातावर चाकूने वार केला. या घटनेत सुमारे १८ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेण्यात आला.
जखमींना तातडीने नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉ. किरणकुमार जाधव यांनी उपचार केले. मात्र, तोळाबाई गोरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर जामखेड पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, नान्नज पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी लोंखडे, तसेच अन्य पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम राबविण्यात येत आहे.




