लोहणेर । वार्ताहर Lohner
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी प्रवास करणार्या एका वृद्ध भाविकाचा आंघोळ केल्या नंतर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विठेवाडी, ता. देवळा येथे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीवरून मृत्यूचे नेमके कारण उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कैलास बुधा सोनवणे (60, रा. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) हे त्या मृत भाविकाचे नाव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळे, जळगाव, नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा व शिंदखेडा आदी परिसरातून हजारो भाविक चैत्रोत्सवानिमित्त गडावर भगवती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी यात्रेस निघाले आहेत. आज सकाळी पायी यात्रेत सहभागी असलेल्या कैलास सोनवणे या वृध्दाने विठेवाडी परिसरातील भालचंद्र निकम यांच्या शेतात अंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था असल्याचे बघितल्याने तेथे थांबून त्यांनी आंघोळ केली. मात्र अंघोळ केल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते अंघोळीच्या ठिकाणीच कोसळले व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
हा प्रकार इतर भाविकांच्या लक्षात येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली असता उपनिरीक्षक विनय देवरे, दिलीप सोनवणे, पोलीस कर्मचारी सुरेश कोरडे, श्रावण शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत मृत सोनवणे यांच्या पिशवीत असलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या नातेवाईकांना फोनव्दारे घटनेची माहिती दिली. यानंतर पंचनामा करीत पोलिसांनी देवळा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला.