अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता परिसरात सकाळी चालायला गेलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे 12 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लिलाबाई गोरख सायकड (वय 66 रा. आसरा सोसायटी, गुलमोहर रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
लिलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरूवारी (25 सप्टेंबर) सकाळी साडेसहा वाजता त्या आपल्या पतीसमवेत नेहमीप्रमाणे वॉकिंगसाठी गेल्या होत्या. दरम्यान, पती गोरख सायकड हे भाजीपाला घेण्यासाठी पाईपलाईन रस्त्यावर थांबले असताना त्या एकट्याच एकविरा चौक ते पारीजात चौक या मार्गे घराकडे निघाल्या.
सकाळी साडेसातच्या सुमारास त्या सिध्देश्वर कॉलनीजवळील कोहिनुर मंगल कार्यालयाजवळ पोहोचल्या असता, दुचाकीवर आलेले दोन अनोळखी इसम त्यांच्या मागून आले. सुरूवातीला त्यांनी हॉर्न वाजवत पुढे जाऊन कॉलनीत प्रवेश केला. त्यानंतर अचानक दुचाकीवरून उतरलेला एक इसम त्यांच्या पाठीमागून धावत येऊन गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओढून नेऊ लागला. दरम्यान लिलाबाईंनी आरडाओरड करत प्रतिकार केला असता, चोरट्याने त्यांचे तोंड दाबून त्यांना खाली पाडले व गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले आहेत. या घटनेमुळे सावेडी उपनगरातील गुलमोहर व पाईपलाईन रस्ता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी वॉकिंगला जाणार्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तात्काळ संशयित चोरट्याला पकडले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.




