शेवगाव | सुनिल आढाव | Shevgav
राज्यात आलेल्या महायुतीच्या त्सुनामी लाटेत मतदारसंघातील शेवगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे, ताजनापूर लिफ्ट, पीकविमा, एमआयडीसी आदी अनेक वर्षांपासून भिजत पडलेले प्रश्न कधी वाहून गेले ते समजलेच नाही. मतदारसंघातील सर्व विरोधी उमेदवारांनी आ. मोनिका राजळे यांच्या विरोधात या प्रश्नावर प्रचारात टीकेचे तोफगोळे डागले. मात्र, महायुतीच्या त्सुनामी लाटेने राजळे यांना विजयाच्या किनार्यावर अलगद आणत हॅटट्रिक करत अनेकांना अचंबित केले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या तिकीटासाठी अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न केले. मात्र, भाजपने आ.राजळे यांना तर अॅड. प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली. माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नातेसंबंध आहेत.
शरद पवार यांच्याशी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घुले यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळे त्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट मिळणे सोपे होते. मात्र, ते लोकसभेला भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ उतरले होते. दुसरीकडे राजळे या भाजपच्या विद्यमान आमदार असल्याने त्यांना महायुतीचे तिकीट फिक्स होते. तर अजित पवारांशी जवळीक असूनही ते महायुतीत असल्याने घुले यांच्यासमोर राजकीय पर्याय नव्हता. हर्षदा काकडे यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांचा छुपा प्रचार केला. त्यांचेही शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर 2014 मधील मिळालेली भाजपची उमेदवारी ऐनवेळी बदलण्याचा कटू अनुभव लक्षात घेऊन पक्षीय उमेदवारीऐवजी त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरवले.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने विधानसभेला महायुती की महाविकास आघाडी? बाजी मारेल याबाबत अंदाज बांधणे अवघड होते. यामुळे अपक्ष उमेदवारी करायची व ज्याचे बहुमत होईल तिकडे जाऊ या डबल डिलींगचा पर्याय अधिक वजनदार ठरेल असे समजून घुले व काकडे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरवले असेल, असा तर्क शेवगाव तालुक्यात व्यक्त होत आहे. यामुळे घुले किंवा काकडे यांना पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाले असते तर विजयाच्या वारुची दिशा कदाचित बदलली असती, अशी चर्चा देखील आता होतांना कानावर येत आहे.
मतदारसंघात शेवगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ताजनापूर लिफ्ट, रस्त्यांची दुरवस्था, पीकविमा, एमआयडीसी तसेच वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांवरील अन्याय, आदी प्रश्नांवर विरोधी उमेदवारांनी फोकस टाकत महायुतीच्या उमेदवार राजळे यांना लक्ष्य केले. मात्र, महायुतीच्या त्सुनामी लाटेत मतदार वाहत गेले व आ.राजळे मागील 2019 च्या निवडणुकीपेक्षा 5 हजार जास्त मतांच्या फरकाने विजयी झाल्या. सरकारने महायुतीने लाडकी बहीण योजना विधानसभेच्या तोंडावर सुरू केली व सोशल इंजिनिअरिंगमध्ये आघाडी घेतली. या योजनेने मार्केटिंग टायमिंग अचूक साधले. त्यामुळे महायुतीला मोठा फायदा झाला. यामुळे सर्वत्र लाडक्या बहिणींनी युतीच्यामागे खंबीरपणे उभे राहत मतांची ओवाळणी दिली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना त्यांच्या दहिगावने परिसरातून मताधिक्य मिळाले.
मात्र शेवगाव शहरात त्यांची झालेली पिछेहाट अनाकलनीय आहे. आ.राजळे यांनी शेवगाव शहरातून थोडीथोडी आघाडी घेत पाथर्डीत पोहचल्यावर आपले घोडे विजयाच्या दिशेने दामटायला सुरुवात केली. तर पाथर्डी तालुक्यातून घुले यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. तेथील मतदारांनी तालुक्यातील उमेदवारांना भरभरुन मतांचा कौल दिला. तसेच ढाकणे यांना मतमोजणीच्या 10 व्या फेरीपर्यंत मतदारांनी तिसरी पसंती दिली. मात्र, 11 व्या फेरीपासून त्यांची मते वाढत जाऊन पुढे ते राजळे यांचे स्पर्धक बनून दुसर्या क्रमांकावर आले व घुले मागे पडले. शेवगावमध्ये घुले यांच्याशी व पाथर्डीमध्ये ढाकणे यांच्याशी मतांची बरोबरी करण्यात व विरोधातील मतविभागणीचा फायदा घेण्यात राजळे यशस्वी झाल्या. तर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होऊन देखील पुन्हा जोमाने तयारी करत राजळे यांनी तिसर्यांदा विधानसभेत जाण्यात यशस्वी ठरल्या.
आ.राजळे यांना भाजपात राहून विरोध करणार्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र, आहेत ते कार्यकर्तेबरोबर घेऊन विकासकामे जनतेसमोर मांडली. लाडकी बहीण व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा प्रचार करत राजळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करण्याचे टाळले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा झालेला फायदा जनतेपर्यंत पोहोचवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ. पंकजा मुंडे, माजी खा. प्रीतम मुंडे यांच्या सभेने अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत मिळाली. ढाकणे घर चलो गाव चलो अभियानातून घराघरांत पोहोचले. त्यांच्या विजयासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील, खा.निलेश लंके यांनी प्रचार सभा घेतल्या.
घुले यांचे तालुक्यातील सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थां वर वर्चस्व आहे. त्यांनी कमी काळात मतदारसंघ पिंजून काढला. निवडणूक प्रचारात चांगलीच हवा भरली. अपक्ष उमेदवार काकडे यांनीही विकासाच्या विविध प्रश्नावर मतदारांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदार त्यांना समजून घेण्यात चुकले की महायुतीच्या लाटेत वाहून गेले हे चिंतनीय आहे. राज्यात विरोधीपक्ष म्हणून राजकीय स्थिती राहिली नसली तरी मतदारसंघात तशी परिस्थिती नाही. आता विरोधकांनी आपली भूमिका योग्य पार पाडली तरच त्यांना मतदान केलेल्या मतदारांना न्याय मिळणार आहे.