श्रीगोंदा | शिवाजी साळुंके| Shrigonda
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सुरूवातीला अत्यंत चुरशीची वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार झाली. निकालाच्या दिवशी पाहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी घेतलेली आघाडी त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली. यात परंपरागत लढत, पाचपुते विरोधकांची मतविभागणी, तरुण चेहरा, माजी आमदार बबनराव पाचपुते यांची भावनिक साद यातच महिला, शेतकरी यांच्या भरघोस मतांमुळे विजयाची गणिते बेरजेची ठरली, याचीच चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 16 उमेदवार उतरलेले असले तरी खरी लढत अनुराधा नागवडे, विक्रम पाचपुते, राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार यांच्यात झाली. सुरूवातीला तिरंगी वाटणारी लढत वंचित बहुजन आघाडीचे शेलार यांच्यामुळे चौरंगी झाली. विक्रम पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक होईल अशी चर्चा करणारे मात्र थोडक्याच मतात गुंडाळले गेले. या निवडणुकीत भाजप पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे थोडे फार कार्यकर्ते यांनी पाचपुते यांच्यासाठी काम केले. भाजपने आपले पक्षाचे निरीक्षक शेवटपर्यंत मतदारसंघात ठेवले. त्यांनी पाचपुतेंसाठी पूरक भूमिका बजावली. विक्रम पाचपुते यांचे चुलत भाऊ साजन पाचपुते हेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते असल्याने त्यांनी आपले घरातले वैर निवडणुकीत दाखवले. थेट अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी सगळी फिल्डिंग लावली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा येथील जागेवर प्रबळ दावा असताना मतदारसंघ शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडे घेतला.
येथे मागील पाच वर्षांपासून तयारी करत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिकीट मिळाले नाही. यामुळे त्यांच्या समर्थकांनी निवडणुक करायचीच अशी भूमिका घेतल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. जगताप यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनुराधा नागवडे थेट तिसर्या नंबरला गेले. महाविकास आघाडीच्या मतांची फूट जगताप आणि नागवडे यांच्यात झाली आणि याच मतविभागणीचा फायदा पाचपुते यांना झाला, ते विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार दिल्याने आणि सगळे विरोधक मिळून एकत्र आल्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचा पराभव झाला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत पाचपुते विरोधक एकत्र आले नाहीत. 2019 च्या निवडणुकीत पाचपुते यांच्या बरोबर नागवडे असतानाही पाचपुते यांचा निसटता विजय झाला होता.
यामुळे नागवडे व पाचपुते हे एकाच पक्षात किंवा मित्र पक्षात असते तरी कुणा एकाला त्याचा फायदा होणार नाही आणि यातच विकास हवा तर आमदार नवा अशी हवा नागवडे यांच्या डोक्यात होती. नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेऊन मोठे शक्ति प्रदर्शन केले. तरीही नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि थेट फारसा कधी मतदारसंघात जनाधार नसलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय केवळ राहुल जगताप यांना तिकीट मिळू नये यासाठी दावेदारी शरद पवार यांच्याकडे न करता खासदार संजय राऊत यांच्या मार्फत मातोश्रीवरून शिवबंधन बांधत तिकीट मिळवले; पण राष्ट्रवादी शरद पवार गट नाराज झाला आणि त्यांनी नागवडे ऐवजी बंडखोर राहुल जगताप यांच्याबरोबर राहण पसंत केले.
अडचणीच्या काळात राहुल जगताप यांनी खासदार शरद पवार गटाला सोडले नव्हते पण तिकीट मिळवण्यासाठी त्यांना मात्र संघर्ष करावा लागला, तरीही तिकीट मिळाले नाही. दरम्यान, हा सर्व खेळ सुरू असताना विक्रम पाचपुते यांनी सूक्ष्म नियोजन करत नवे जुने पाचपुतेंचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र केले. सोबतच पक्षातील कार्यकर्ते बरोबर घेत गावोगावी तरुणांच्या बैठका आणि दौरे करत प्रचार केला. पाचपुते परिवाराने आणि गावातील भावकीने, गावाने देखील विक्रम पाचपुते यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या विजयासाठी काम केले.