अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज सोमवारी (दि. 10) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने तयारीवर भर दिला आहे. दरम्यान, पालिका निवडणुकीसाठी राज्य अथवा जिल्हा पातळीवरून महायुती अथवा महाविकास आघाडीबाबत कोणतीच घोषणा नसल्याने सर्व पक्षाकडून जवळपास स्व-बळावर निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 4) राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड या नगरपलिका व एक नेवासा नगरपंचायतचा समावेश आहे. आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमामध्ये नामनिर्देशन अर्ज हे 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत भरण्याची मुदत दिली आहे.
अर्ज स्वीकारण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 हा कालावधी निश्चित केला आहे. जिल्ह्यात 12 पालिकांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहे. यंदा पहिल्यांदा सहाय्यक निवडणूक अधिकार्यांची दोन पदे नियुक्त करण्यात आल्या. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 अशी राहील. प्राप्त अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. वैध अर्जदारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहील. माघारीनंतर उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान 2 डिसेंबर रोजी असून मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहील. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी 1 हजार रुपये तर अनुसूचित जाती उमेदवारांसाठी 500 रुपये इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक, तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक आवश्यक असतील. अर्जदार व सूचक यांच्यावर कोणताही कर थकबाकी नसावी.
उमेदवारांना मालमत्ता व गुन्हेगारी संदर्भातील दोन स्वतंत्र हमीपत्र सादर करावे लागतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नगर पालिका व नगर पंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र अद्यापही अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीबाबत नेत्यांनी अधिकृतपणे घोषणा एकाही पालिका क्षेत्रात केलेली नाही. जिल्ह्यात 12 पालिकांच्या निवडणुका होत आहे. परंतू महायुती व महाविकास आघाडीबद्दल अद्यापही कोठेच कोणतीही चर्चा झाली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहे. शिर्डीमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, निर्णय झाला नाही. यामुळे सध्या तरी महायुती व महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी जवळपास स्व बळावर निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
अजितदादा गटाच्या आज मुलाखती
नगरजवळील केडगाव येथे आज सोमवार (दि.10) रोजी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. संपर्कमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत आधी पालिका आणि त्यानंतर झेडपी, पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटातील दक्षिणेतील कार्यकर्त्यांचा रविवारी नगरला संघटनात्मक बैठक झाली.
भाजपच्या तालुकानिहाय बैठका
नगर दक्षिणेतील नगर पालिका होणार्या भागातील इच्छुकांच्या मुलाखती गेल्या दोन ते दिवसांपासून त्या त्या तालुक्यात घेण्यात आलेल्या आहेत. नगर दक्षिणेतून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या उमेदवारांची एकत्रित माहिती आज सोमवार (दि.10) जिल्हास्तरावर उपलब्ध होणार असून त्यानंतर माध्यमांना देण्यात येणार असल्याचे भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली.




