Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) फॉर्म १७ सीच्या द्वारे गोळा केलेल्या माहितीनुसार पहिल्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यासंदर्भातील याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. निवडणूक आयोग उशीरा आकडेवारी जाहीर करणार असल्याने त्यात काही गडबड आहे, अशी टीका केली जात होती. यानंतर आयोगाकडून आज टप्प्यांनुसार आकडेवारी (Statistics) जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के इतके मतदान (Polling) झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच चौथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के मतदान असून पाचव्या टप्प्यात ६२.२० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांपेक्षा पाचव्या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.

तर सोमवार (दि.२० मे) रोजी पाचव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. या टप्प्यात एकूण ६२.२० टक्के मतदान नोंदवले गेले. त्यापैकी पुरुष मतदारांचे मतदान ६१.४८ टक्के तर महिलांचे मतदान ६३ टक्के झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये महिला मतदारांचे मतदान कमी नोंदवले गेले. तर या टप्प्यात मतदान झालेल्या ४९ मतदारसंघांपैकी २४ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण जास्त होते, त्यापैकी २२ मतदारसंघांमध्ये २०१९ मध्येही हाच कल नोंदवला गेला होता.

बिहार, झारखंडमध्ये आघाडी

विशेष म्हणजे बिहार, झारखंड या राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. बिहारमध्ये ५३.४२ टक्के पुरुषांचे मतदान झाले असून ६१.५८ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तर झारखंडमध्ये ६८.६५ टक्के महिला आणि ५८.०८ टक्के पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
यात झारखंडमधील कोडरमा मतदारसंघात ५४.१५ पुरुषांनी, तर ७० टक्के महिलांनी मतदान केले आहे.

महाराष्ट्रात पुरुषांचे मतदान अधिक

जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी महिलांनी मतदान केले. मात्र, बिहार, झारखंडमध्ये अधिक महिलांनी मतदान केले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. यामध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या १३ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी पाहिली असता पुरुष मतदारांनी अधिक मतदान केल्याचे एकूण टक्केवारीतून समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने काय दावा केला?

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आयोगाच्या टक्केवारीत कुठलाही बदल झालेला नाही. निवडणूक प्रक्रियेचे काम बिघडणवण्यासाठी खोटे आरोप करण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा टप्पा झाल्यानंतर ४८ तासांनी डाटा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेबसाईटवर अपलोड करणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज वेबसाईटवर पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या