Sunday, July 7, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणुक आयोगाने दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणुक आयोगाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहे. आता राजकीय पक्षांसोबत सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. त्या दृष्टीने नेत्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. एकीकडे नेत्यांची तयारी सुरु असतानाच आता केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रासह इतर ३ राज्यांच्या विधानसभांबाबत महत्वाची अधिसुचना जाहीर केली आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. यासाठी आज मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व सामान्य नागरीकांना आवाहन देखील केले आहे. त्यांनी असे म्हंटले की ज्यांनी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी केली नसेल त्यांनी तातडीने मतदार नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन केले आहे. यासोबतच, घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करा, अशा सुचना देखील आयोगाने दिल्या आहे.

२५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाने महत्त्वाची बाब नमूद केली आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सध्या काय स्थिती?
लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागला. त्यात महाराष्ट्रात प्रामुख्याने महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत होती. या लढतीमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. महायुती पेक्षा मविआ ने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळवता आला. लोकसभेतल्या या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. लोकसभेत ज्याप्रमाणे लोकांनी भाजपाला नाकारलं तसंच चित्र विधानसभेतही दिसेल आणि आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तर भाजपासह महायुतीनेही आम्ही चांगली कामगिरी करु असा दावा करत आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लोकसभेसारखेच विधानसभेतही महायुतीचा सुपडा साफ करु असे मविआचे नेते सांगत आहे. येत्या ४ महिन्यात राज्यातील सरकार बदलणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांची जागावाटपाबाबत बोलणी सुरू आहे. दुसरीकडे लोकसभेतील अपयश विसरून महायुतीचे नेते देखील विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीला लोकसभेत महायुतीपेक्षा केवळ दीड टक्के जास्त मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण जोर लावला, तर पुन्हा राज्यात सत्तास्थापन करू शकतो. त्यामुळे जोमाने कामाला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या