Saturday, November 23, 2024
Homeनगरप्रशिक्षणास 17 क्षेत्रिय अधिकार्‍यांची दांडी; निवडणूक विभाग बजावणार नोटीस

प्रशिक्षणास 17 क्षेत्रिय अधिकार्‍यांची दांडी; निवडणूक विभाग बजावणार नोटीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने आवश्यक तयारी करण्यात येत आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून प्रत्यक्षात मतदानात सहभागी होणार्‍या विधानसभा मतदारसंघाच्या (तालुकानिहाय) 389 क्षेत्र अधिकारी आणि 255 क्षेत्रिय पोलीस अधिकार्‍यांसाठी मंगळवारी नगरला जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 17 क्षेत्रिय अधिकार्‍यांनी दांडी मारली. त्यांना नोटीस बजावून खुलासा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ असून त्याठिकाणी प्रत्येक मतदारसंघात मोठा गाव अथवा भागाच्या परिसारात अनेक गावांसाठी मिळून एक क्षेत्रिय निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

या क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या खांद्यावर मतदानाची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी मतदानाआधी आणि मतदानानंतर, तसेच मतदानादरम्यान काही गोंधळ झाल्यास, मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात असे 389 क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या मदतीला 255 क्षेत्रिय पोलीस अधिकारी सोपवण्यात आलेले आहेत. या सर्वांना मंगळवारी नगरला पानरनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी 17 अधिकारी गैरहजर होते.

या क्षेत्रिय अधिकार्‍यांमध्ये प्रत्येक तालुक्यातून वर्ग दोनच्या सर्व शासकीय विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जिल्हास्तरावर राबवण्यात आलेल्या प्रशिक्षणास पूर्व परवानगीने गैरहजर असणार्‍या 17 अधिकार्‍यांना आता जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या पथकांचे प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भास्कर पाटील असून सहायक नोडल अधिकारी म्हणून शिक्षक नरसाळे काम पाहत आहेत.

आज भरारी पथकाला प्रशिक्षण
विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात असणार्‍या वेगवगळ्या भरारी पथकांच्या प्रमुखांना उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे प्रशिक्षण देणार आहेत. या भरारी पथकात अवैध दारू, पैसे यासह सर्व विभागावर छापा मारणार्‍या भरारी पथकांचा समावेश आहे.

जिल्हास्तरावरील प्रशिक्षण संपले
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर असणारे विविध विषयांसह मतदान पूर्व आणि प्रत्यक्ष मतदानासाठी देण्यात येणारे विविध प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण होवून आता तालुका (विधानसभा मतदारसंघ) निहाय प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या