श्रीगोंदा (प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला. आता पाऊस उघडला. वीज मंडळाने शेतकर्यांना जेरीस आणले आहे. कार्यकारी अभियंता म. राज्य वीज मंडळ, कर्जत जि.अहमदनगर यांचेकडून शेतकर्यांना जळालेले ट्रान्सफार्मर महिना , दोन महिने मिळत नाहीत. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे ठेकेदार भरपूर आहेत. परंतु वीज मंडळाकडे ऑईल नसल्याचे कारण वेळोवेळी सांगितले जाते. कधी कधी तुमचा नंबर फार लांब आहे असे सांगितले जाते. वीज मंडळात लाईन ओढण्याची ठेकेदारी करणारे काही ठेकेदार शेतकर्यांकडून 15 ते 20 हजार रुपये घेऊन ऑईलसह ट्रान्सफार्मर तातडीने पोहोच करतात. ही शेतकर्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक आहे अशी तक्रार श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवून केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवरही दाखल केली आहे.
प्रा. दरेकर म्हणाले, हिरडगाव येथील दरेकर मळ्यातील ट्रान्सफार्मर 15 दिवसात दोन वेळा जळाला. त्याच्या कारणांची शहानिशा करून वीज मंडळाने ट्रान्सफार्मर भरणार्या ठेकेदाराकडून हमी ( वारंटी) कालावधीत तातडीने ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी वीज मंडळाने तत्परता दाखविली पाहिजे. परंतु वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्यांनाच पिळू पिळू घेतात. एका बाजूला शेतकर्यांना न्याय देणार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात आणि वीज मंडळाचे अधिकारी नेमके उलटे वागतात. शासनाने जळालेला ट्रान्सफार्मर दोन ते तीन दिवसात देण्याची व्यवस्था करावी व त्यासाठी लागणारे ऑईल मान. कार्यकारी अभियंता , म.रा. वीज मंडळ यांना उपलब्ध करून द्यावेत. ऑईलसाठी शेतकर्यांचा खोळंबा करू नये.
वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्यांना जुमानत नाहीत. त्यांची चेष्टा करतात. फोन उचलत नाहीत. ट्रान्सफार्मर घेऊन जाण्यासाठी शेतकर्यांना भाड्याच्या गाड्या करावयास लावतात. दरमहा किती ट्रान्सफार्मर जळाले ? त्यापैकी किती भरून दिले ? किती दिवसांनी भरून दिले ? याचा आढावा दर महिन्याला वरिष्ठ अधिकार्यांनी घेतला पाहिजे.
सध्या शेतकरी सर्व खात्यामध्ये वीज खात्याला फारच वैतागलेले आहेत. या खात्याच्या सचिवांनी स्वत: लक्ष घालून याबाबत शिस्त निर्माण करावी अशी अपेक्षा आहे. सध्या कर्जत ( अहमदनगर ) येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे सुमारे 80 जॉब (ट्रान्सफार्मर) शेतकर्यांना देणे पेंडिंग आहेत, अशी माहिती मिळते.हे किती दिवसांनी मिळणार ? तोपर्यंत शेतकर्यांची पिके जगणार का ? हा खरा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर वीज मंडळ अनैसर्गिक आपत्ती निर्माण करीत आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.