अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे युवा शेतकर्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील जेऊर गावात घडली. रवींद्र बाळासाहेब पाटोळे, असे या शेतकर्याचे नाव आहे. दरम्यान, संतप्त गावकर्यांनी रवींद्र यांचा मृतदेह महावितरण अधिकार्याच्या टेबलावर ठेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी गावकरी आक्रमक झाले होते.
खांबात वीज प्रवाह येत असून तो दुरूस्त करण्यात यावा अशी तोंडी तक्रार शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयाकडे केली होती. मात्र महावितरणकडून दुरूस्तीचे काम करण्यात आले नव्हते. शेतकरी पाटोळे हे आपल्या शेतात विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, जेऊर येथील ग्रामस्थांनी महावितरणाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करत पाटोळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जेऊर येथील महावितरणाच्या कार्यालयात अधिकार्यांच्या टेबलावर ठेवला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची जेऊर येथील ही चौथी घटना आहे. तक्रार देऊनही दखल घेतली गेली नसल्याने युवा शेतकर्याला आपले प्राण गमवावे लागले असल्याचे गावकर्यांचे म्हणणे असून विद्युत महावितरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी गावकर्यांनी गर्दी केली होती.