मुंबई | Mumbai
आयपीएल २०२४ (IPL 2024) च्या हंगामातील साखळी फेरीच्या सामन्यांचा थरार आटोपल्यानंतर कालपासून (दि.२१) बाद फेरीच्या लढतींना सुरुवात झाली आहे. यात पहिला क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळविला. त्यामुळे ते थेट आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचले आहेत. त्यानंतर आज दुसरा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात होणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून या सामन्यातील पराभूत संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. तर विजयी संघाला क्वालिफायर २ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या ८ सामन्यात १ विजय आणि ७ पराभव स्वीकारावा लागलेल्या बंगळूरुने दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक करताना सलग ६ सामन्यात विजय संपादन केला आहे. यानंतर आज होणाऱ्या सलग सातव्या सामन्यात (Match) विजय संपादन करून क्वालिफायर २ मध्ये धडक मारण्यासाठी बंगळूरु सज्ज असणार आहे.
हे देखील वाचा : IPL 2024 : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज पहिला क्वालिफायर सामना
तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्ससाठी दुसरा टप्पा निराशाजनक राहिला आहे. राजस्थानला ५ पैकी सलग ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा अखेरचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी राजस्थान रॉयल्सला असणार आहे. तसेच बंगळूरुने अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध शानदार विजय संपादन केल्याने ते आपली विजयी लय कायम राखण्यासाठी सज्ज असणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत तब्बल ३१ सामने खेळविण्यात आले आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पारडे जड राहिले आहे. राजस्थान रॉयल्सने १३ तर बंगळूरुने १५ सामन्यात विजय संपादन केला आहे. याशिवाय ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. बंगळूरुसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसन आणि रियान पराग सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले आहेत. तसेच राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक बळी युझवेंद्र चहलने आणि बंगळूरुसाठी यश दयाल आणि मोहम्मद सिराजने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
सलिल परांजपे, नाशिक