अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणांविरोधात तसेच नव्याने लागू केलेल्या चार श्रमसंहितांमुळे देशातील कामगारांचे हक्क धोक्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी (9 जुलै) देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला अहिल्यानगर शहरात जोरदार प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, बीएसएनएल, महापालिका कर्मचारी आणि विविध युनियनने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारविरोधात तीव्र घोषणा देत निषेध व्यक्त केला.
मोर्चाची सुरूवात अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापालिका चौकातून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला असता, परिसर घोषणांनी दणाणून गेला. जुनी पेन्शन योजना पुनः लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचार्यांच्या सेवेत नियमितता, 10-20-30 वर्षे सेवेनुसार पदोन्नती, रिक्त पदांची तातडीने भरती, आठवा वेतन आयोग स्थापन करणे आदी विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अॅड. सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते, भाऊ डमाळे, महेंद्र हिंगे, विजय काकडे, व्ही. डी. नेटके, अशोक मासाळ, युवराज पाटील आदींनी केले. आंदोलनकर्त्यांनी 20 प्रमुख मागण्यांचा समावेश असलेली निवेदनाची प्रत जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली.
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आणि एनएफटीई या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने केली. कॉ. आप्पासाहेब गागरे, विजय शीपणकर, अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध नोंदवण्यात आला. सरकार बीएसएनएलला कमकुवत करून खासगी कॉर्पोरेट्सना फायदा पोहचवत आहे असा आरोप करत, जुनी पेन्शन योजना, वेतनवाढ, पदोन्नती धोरण लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनच्या वतीनेही स्वतंत्रपणे प्रशासनिक कार्यालयासमोर निदर्शने करून उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदन देण्यात आले. सचिव आनंद वायकर, अध्यक्ष जितेंद्र सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. यावेळी चार श्रमसंहितांचे कायदे, जनसुरक्षा विधेयक, आऊटसोर्सिंग विरोधात निषेध नोंदवत कर्मचार्यांना न्याय मिळण्यासाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
कामगार कायद्यांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक संघटनेनेही स्वतंत्रपणे निदर्शने केली. महापालिकेसमोर झालेल्या निदर्शनात शेतकरी, आशा सेविका, आणि विविध क्षेत्रांतील कामगारांनी सहभाग घेतला. शेतकर्यांसाठी किमान आधारभूत किंमत, संपूर्ण कर्जमाफी, मनरेगामध्ये 200 दिवसांचे रोजगार, शिक्षण व आरोग्यावर जीएसटी रद्द करणे, आशा व आहार सेविकांना सन्मानजनक मानधन देणे, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या. या देशव्यापी संपाच्या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरूध्द एल्गार केला. मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.




