Saturday, July 27, 2024
Homeनगरअतिक्रमणे, मोकाट जनावरांबाबत कारवाईच्या अधिकार्‍यांना सूचना

अतिक्रमणे, मोकाट जनावरांबाबत कारवाईच्या अधिकार्‍यांना सूचना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील अतिक्रमणे, मोकाट जनावरे, अनाधीकृत बांधकाम व नळजोडणी यासह विविध विषयांचा आढावा घेत, विविध विषयांबाबत आमदार लहू कानडे यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह अधिकार्‍यांना सूचना केल्या.

- Advertisement -

नगर परिषदेच्या सभागृहात आ. कानडे यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांकडून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माजी नगरसेवक अशोक कानडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, प्रवीण काळे, अ‍ॅड. सुभाष जंगले, सरवरअली सय्यद, सागर कुर्‍हाडे, रज्जाक पठाण, संतोष मोकळ, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त करत ती काढण्याच्या सूचना आ. कानडे यांनी केल्या. अनेक मोकाट जनावरांना लंम्पिचा आजार जडला असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, या जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकावे, मोकाट जनावरे, डुकरे, कुत्रे यांचा सर्व्हे करावा. अनेकांनी गटारीसह इतर ठिकाणी अनाधिकृत बांधकामे केली आहेत, याची माहिती घेऊन त्याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे आमदार कानडे म्हणाले.

अनेक ठिकाणी मंजूर कामांचे फलक लावण्यात आलेले नाहीत असे सांगून बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र न देणे हे बांधकाम अपूर्ण असल्याचे कारण आहे, त्यासाठी कामाची वर्गवारी करणे आवश्यक असल्याचे आ. कानडे यांनी स्पष्ट केले. बांधकामाची तसेच रेटा अंतर्गत नोंदणीकृत बिल्डरची माहिती द्यावी, घरकुलासाठी असलेल्या राखीव जागेची माहिती द्यावी, मंत्रालय स्तरावरील प्रलंबित कामांची माहिती द्यावी, जेणे करून ती कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आ. कानडे यावेळी म्हणाले.

शांतता समितीच्या बैठकीत नगरपरिषदेसंबंधी झालेल्या विषयांवर गांभीर्याने विचार करावा, शहरात अनेक ठिकाणी मटका सुरु आहे. मोकाट जनावरे यासह इतर विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली. त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचनाही यावेळी आ. कानडे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या