अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अविनाश जालिंदर गुंड (वय 31, रा. कसबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर, मुळ रा. वाघळुज, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या घरात दिवसा चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. या घटनेत सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह तीन लाख 14 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून, गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (6 नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अविनाश गुंड हे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (5 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता, ते पत्नी व मुलगी सोबत कापडबाजारात खरेदीसाठी गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी घराच्या दरवाजाला व्यवस्थित कुलूप लावले होते. सायंकाळी 4.45 वाजता परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, घराच्या दरवाजाची कडी तुटलेली आहे. आत प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या.
तात्काळ त्यांनी नातेवाईक व फ्लॅटचे मालकाला संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फिंगरप्रिंट तज्ञ व डॉग स्क्वॉड यांना पाचारण करून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कपाटातील लॉकर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले.
15 ग्रॅमची सोन्याची चैन, एक ग्रॅमची सोन्याचे कानातील व सटवाई, 50 ग्रॅमचे चांदीचे पैंजण, 20 ग्रॅमचे चांदीचे जोडवे व दोन लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम असा एकुण तीन लाख 14 हजार 700 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.




