मँचेस्टर | Manchester
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमधील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मँचेस्टरच्या इमिरेट्स ऑल ट्रॅफर्ड या मैदानावर खेळवला जाणार आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता करण्यात येणार आहे. विंडीज संघाला चारीमुंड्या चीत केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध अशीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. तर पाकिस्तानही मालिकेचा शुभारंभ विजयाने करण्यासाठी सज्ज आहे.
विंडीजविरुद्ध मालिकेत १-० ने पिछाडीवर पडून सुद्धा इंग्लंड संघाने मालिकाविजय साकार केला होता. त्यामुळे पाकिस्तानला गाफील राहून चालणार नाही. पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघाने विंडीजविरुद्ध मालिकेतील असलेल्या आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीची मदार रोरी बर्न्स , डोमिनिक सिबली , जोस बटलर , जो रूट , ओली पॉप आहेत इंग्लंड संघासाठी जमेची बाजू म्हणजे जोस बटलर , ओली पॉप , बेन स्ट्रोक्स , रोरी बर्न्स चांगली फलंदाजी करत आहेत. इंग्लंड संघाचा नियमित कर्णधार जो रूटला विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला आपली कामगिरी सुधारण्याची संधी या मालिकेतून मिळणार आहे.
अष्टपैलूंमध्ये बेन स्ट्रोक्स चांगली कामगिरी करत आहे. त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. स्टुअर्ट ब्रॉडने अखेरच्या कसोटीत आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर इंग्लंड संघाला मालिकाविजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर स्टुअर्ट ब्रॉड , जेम्स अँडरसन जोफ्रा आर्चर डोम बीस क्रिस वोक्स आहेत.
– सलील परांजपे, नाशिक