मुंबई | Mumbai
अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कमाल रशीद खानला (Actor Kamaal Khan) शुक्रवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. यानंतर आज (दि.२४) रोजी कमालला न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता त्याला मंगळवार (दि.२७ जानेवारी) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा हे गोळीबार (Firing) झालेल्या इमारतीमध्ये दुसऱ्या आणि मॉडेल प्रतीक बैद चौथ्या मजल्यावर राहतात. सुरुवातीला गोळ्या कोणी झाडल्या हे स्पष्ट नव्हते. मात्र आता तपासा दरम्यान केआरकेने गोळीबार केल्याचे समोर आले होते. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याच्या स्टुडिओमधून ताब्यात घेतले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. यानंतर मुंबई पोलिसांनी अधिक चौकशी केली असता केआरकेने स्वतःच्या बंदुकीतून चार राऊंड फायर केल्याची कबुली दिली होती.
कमाल खानचे म्हणणे काय?
कमाल खानच्या म्हणण्यांनुसार त्याचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता. तो त्याची बंदूक साफ करत होता. त्याच्या घरासमोर एक मोठे खारफुटीचे जंगल आहे. जिथे बंदूक साफ केल्यानंतर त्याची टेस्ट करण्यासाठी त्याने गोळीबार केला. अभिनेत्याला वाटले होते की, गोळी खारफुटीच्या जंगलात जाईल, पण जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा सोसाट्याचा वारा आला त्यामुळे गोळी थोडी पुढे जाऊन ओशिवरा परिसरातील एका इमारतीला लागली. यानंतर पोलिसांनी कमाल खानची बंदुक जप्त केली असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.




