मुंबई | Mumbai
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने (Cancer) निधन झाले आहे. आज (रविवारी) पहाटे ४ वाजता मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून, त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सुष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे यांचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट (Hindi Movie) आणि मालिकांमध्ये काम केले. ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये (Marathi Serials) काम केले.
याशिवाय त्यांनी ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. प्रिया मराठे या सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून सक्रिय नव्हत्या. त्यांनी २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते.
दरम्यान, प्रिया मराठे या मध्यंतरी कर्करोगातून बऱ्या झाल्या होत्या. यानंतर त्यांनी परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढले होते. त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज (रविवारी) पहाटे त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.




