मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर जुहू येथे झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणात (Firing Case) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मोठे यश आले आहे. राजस्थान एजीटीएफ (AGTF) आणि कोटा शहर पोलिसांनी (Kota Police) संयुक्त कारवाई करत, राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या काही तासांतच तिन्ही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात बिश्नोई गँगने स्वीकारली असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
संशयित आरोपींची ओळख आणि पार्श्वभूमी
पकडण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे, तर दुसरा १८ वर्षीय ऋतिक कुमार उर्फ रोशन (मूळचा बिहारचा, मुंबईत रॅपिडो रायडर म्हणून कार्यरत) आणि तिसरा २२ वर्षीय रेहान (हरियाणाचा) आहे. हल्ल्यानंतर (Attack) हे सर्व जण हरियाणात (Hariyana) पळून जाण्याच्या तयारीत होते.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “हे डरपोक लोक लपून…”; CM फडणवीसांची टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया
नेमके काय घडले?
रविवारी संध्याकाळी जुहू येथील फुटबॉल मैदानावरून सुटल्यानंतर टायगर श्रॉफ आपल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसत असताना हा हल्ला झाला. गोळीबारात एका हल्लेखोराची बंदूक जाम झाली, तर दुसऱ्याने गोळीबार सुरूच ठेवला. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला असला तरी गाडीच्या काचा फुटल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र, त्याचा कारचालक फिरदौस (नानावटी रुग्णालयात उपचार सुरू) आणि टायगरचा फॅन उमेश चरण (छातीत गोळी लागल्याने केईएम रुग्णालयात उपचार सुरू) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टायगरने प्रसंगावधान राखत स्वतः गाडी चालवून जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.
बिश्नोई गँगने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
गोळीबारानंतर काही वेळातच बिश्नोई गँगच्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिप जारी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर मुंबई पोलिसांची १५ विशेष पथके आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेतला जात आहे.
हे देखील वाचा : Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी तीन संशयित ताब्यात; मुंबई अन् कोटा पोलिसांची संयुक्त कारवाई
गोळीबारानंतर असे पळाले संशयित
- – सायंकाळी ७:०० वाजता: जुहू येथील पुष्पा पार्क मैदानाजवळ टायगर श्रॉफच्या कारवर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला (सुमारे १० राऊंड फायर).
- – सायंकाळी ७:१२ वाजता: घटनास्थळावरून पसार होत आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर आपली पल्सर दुचाकी सोडून लोकल पकडली आणि ते वसई रोड स्थानकावर पोहोचले.
- – रात्री १०:०९ वाजता: वसई रोड येथून त्यांनी ‘पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस’ (ट्रेन क्रमांक १२९३९) पकडली.
- – सकाळी १०:१७ वाजता (दुसऱ्या दिवशी): कोटा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.



