मुंबई | Mumbai
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेले अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय चित्रपट निर्माते व शाह यांचे मित्र अशोक पंडित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) नेण्यात आले होते. मात्र आज (शनिवार) दुपारच्या सुमारास शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधानामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
सतीश शाह यांनी मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांति ओम, हम आपके हैं कौन आणि जाने भी दो यारों सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांनी २५० च्यावर हिंदी चित्रपटात काम केले होते. तर टीव्ही सीरिअल आणि मराठी चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. “साराभाई विरुद्ध साराभाई” या टीव्ही शोमध्ये इंद्रवदन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखले जाते. त्या भूमिकेमुळे शाह घराघरात लोकप्रिय झाले होते. या कॉमेडी शोमध्ये सतीशचा अभिनय उल्लेखनीय होता. आजही या शोच्या क्लिप्स इंस्टाग्रामवर व्हायरल होतात.
दरम्यान, सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ साली मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला होता.यानंतर मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर एफटीआयआय मधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. तर १९७० साली त्यांनी त्यांच्या चित्रपट (Movie) करिअरला सुरूवात केली. ये जो हैं जिंदगी ही त्यांची पहिली मालिका होती. चारच दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता सतीश शाह यांनीही जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.




