मुंबई | Mumbai
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shanataram) यांचे निधन झाले आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
संध्या शांताराम यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३८ साली झाला. त्यांचे मूळ नाव विजया देशमुख (Vijya Deshmukh) होते. १९५९ -६० च्या दशकात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. यात १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना चकित केले होते.
दरम्यान, संध्या शांताराम या व्ही शांताराम (V Shantaram) यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘पिंजरा’ हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट (Movie) होते. ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटात त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.
मंत्री आशिष शेलार यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, “भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! अभिनेत्रीच्या निधनाने इंडस्ट्रीतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




