Sunday, May 19, 2024
Homeब्लॉगउद्यमशील महिलाशक्तीला हवे पाठबळ

उद्यमशील महिलाशक्तीला हवे पाठबळ

2022 मध्ये देशात 136 युनिकॉर्न कंपन्या होत्या. त्यापैकी केवळ पाच कंपन्या महिला उद्योजकांच्या होत्या. आपले कर्तृत्व लिलया सिद्ध करणार्‍या महिलांना वाढीसाठी उत्तम अवकाश निर्माण करून देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सरकारने तर यासंदर्भात आवर्जून काही पावले उचलली पाहिजेत. तसेच समाजानेही नवउद्यमी महिलाशक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.

पीडब्ल्यूसी इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार, 2022 मध्ये अगदी पहिल्या टप्प्यात नवोद्योगांना मिळणार्‍या निधीत 12 टक्क्यांची वाढ झाली. एखादा तंत्रज्ञानप्रधान नवोद्योग सुरू होण्याच्या अत्यंत प्राथमिक टप्प्यात असतो, तेव्हा त्याला निधीची खूप गरज असते. 2021 आणि 2022 मध्ये नवोद्योगांना जे एकूण भांडवल मिळाले त्यापैकी 60 टक्के निधी हा प्राथमिक टप्प्यातच मिळाला, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक नवोद्योगास या टप्प्यात सरासरी 40 लाख डॉलर्स मिळाले. 2022 मध्ये भारतात 136 युनिकॉर्न कंपन्या होत्या. 100 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असणार्‍या कंपन्यांना युनिकॉर्न असे म्हणतात. पण दुसरी एक बाब म्हणजे 136 युनिकॉर्न्समध्ये केवळ पाच कंपन्या महिला उद्योजकांच्या होत्या. आपले कर्तृत्व लिलया सिद्ध करणार्‍या महिलांना वाढीसाठी उत्तम अवकाश निर्माण करून देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सरकारने तर यासंदर्भात आवर्जून काही पावले उचलली पाहिजेत.

भारताच्या जनगणना विभागाच्या 2013 ते 2017 मधील अंदाजानुसार, देशात महिलांचे सरासरी आयुष्य 70 वर्षे तर पुरुषांचे 67 वर्षे इतके आहे. दरवर्षी सरासरी एक लाख मुलांच्या जन्मामागे 130 महिलांचा मृत्यू होत असतो. आर्थिक बाबींचा विचार करताना सामाजिक बाबीही विचारात घ्याव्या लागतात. अजूनही महिला उद्योजकांची संख्या कमी असणे आणि युनिकॉर्न्समध्येही महिलांचा वाटा अत्यल्प असणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी महिला उद्योजकतेचा आणि एकूणच महिलांमधील उद्यमशीलतेचा साकल्याने विचार व्हायला हवा. त्यांना कोणत्या प्रकारचे पाठबळ मिळाल्यास कर्तृत्व सिद्ध करणे सोपे होईल, याचा अदमास घेऊन योजना आखल्या जायला हव्यात. याअनुषंगाने कल्पनांना पाठबळ मिळणे आणि चांगल्या संकल्पनांना पतपुरवठा होणे महत्त्वाचे आहे. यात किमान लिंगभेद तरी यायला नको. अनेक कर्तबगार महिलांनी याअनुषंगाने उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कर्तृत्वगाथा बोलक्या आहेत. त्यातून धडा घेण्याची आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी काही कर्तृत्वशालिनींच्या यशोगाथा तपासून पाहायला हव्यात.

- Advertisement -

सुमारे 45 वर्षांपूर्वी किरण मजुमदार-शॉ यांनी बंगळुरूमधील एका गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ या कंपनीची स्थापना केली. त्यांचे वडील रसेंद्र मजुमदार हे संयुक्त बु्रवरीजचे मुख्य ब्रू-मास्टर होते. त्यांनीच किरण यांना आंबवणशास्त्र किंवा ब्रुईंगचे विज्ञान शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवले. 1974 मध्ये या कोर्ससाठी त्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या. किरण यांनी आधी कार्लटन आणि युनायटेड ब्रुवरीजमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आणि नंतर भारतात येऊन काही खासगी कंपन्यांमध्ये अनुभव घेतला. परंतु त्यांनी बंगळुरू किंवा दिल्लीमध्ये कामाची संधी मिळते का हे पाहिले, तेव्हा महिला असल्यामुळे त्यांना कोणत्याही कंपनीत मास्टर-ब्रुअरर म्हणून काम मिळणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र हे एक आव्हान मानून किरण यांनी केवळ दहा हजार रुपये भांडवलावर भाड्याच्या गॅरेजमध्ये ‘बायोकॉन’ची स्थापना केली. कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती. वैज्ञानिक कौशल्य असलेले कामगारही मिळत नव्हते. अशा अडचणींमधून किरण यांनी बायोकॉन ही एक महाकाय कंपनी बनवली आणि जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आज बायोकॉन ही कंपनी भारतात अग्रेसर असून जगातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजक म्हणून किरण यांचा ‘फोर्ब्स’ मासिकाकडून गौरव झाला आहे. इतक्या वर्षांनंतर आजही पहिल्या पिढीतील महिला उद्योजकांना व्यवसायाचे ज्ञान, कायदे आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोच.

सात वर्षांपूर्वी चेन्नई येथील हरिणी शिवकुमार यांचे वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्न झाले. त्यांचा मुलगा ‘डाऊन्स सिंड्रोम’ असलेला आहे. त्वचारोगही असल्यामुळे त्यांचा लहान मुलगा बाहेरचे साबण वापरू शकत नव्हता. अशावेळी हरिणी यांनी घरच्या घरी साबण बनवायला सुरुवात केली आणि या साबणांना खूप मागणीही यायला लागली. हरिणी यांनी मग ‘अर्थ र्हिदम’ या नावाने स्टार्टअप सुरू केला. त्यांनी शेळीच्या दुधापासून बनवलेले साबण, बॉडी बटर लोशन्स आणि पुनर्वापर करता येऊ शकतील अशा मेकअप रिमुव्हर्सचे उत्पादन सुरू केले. आज या कंपनीची उलाढाल 200 कोटी रुपयांची असून ‘नायका’सारख्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली आहे.

उत्तराखंड येथील मीनाक्षी खाती यांचे वय अवघे 24 वर्षांचे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी केवळ 50 हजार रुपयांच्या भाडवलावर ‘मीनाकृती’ ही कंपनी सुरू केली. ही कंपनी कोस्टर्स, कार्ड्स, पिशव्या आणि मुख्यतः उत्तराखंडमधील ‘ऐपण’ शैलीच्या चित्रांनी सजवलेल्या वस्तू विकते. कंपनीची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपयांची आहे. वारली आणि मधुबनी चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच पद्धतीने उत्तराखंडमधील ऐपण या लोककलेचा प्रसार व्हावा, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

कीर्तिप्रिया या तीस वर्षांच्या स्त्रीने तेलंगणमधील थोंडा या दुर्गम भागातील खेड्यात ‘नर्चर फिल्ड्स इंडस्ट्रीज’ हा प्रकल्प स्थापन केला. ‘ओह फुड्स डॉट इन’ या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही कंपनी भाज्यांच्या निर्जलीकृत पावडर विकते. त्यांच्या प्रकल्पात बहुसंख्य महिला कर्मचारीच आहेत. ग्रामीण भागातही उत्तम व्यवसाय करून रोजगारनिर्मिती करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

मुंबईतील श्वेता तिवारी या एका जाहिरात संस्थेत कला संचालक म्हणून काम करत होत्या. त्यांनी 2014 मध्ये बिहारमधील गया या आपल्या मातृभूमीत ‘चुंगी स्टोअर डॉट कॉम’ ही कंपनी स्थापन केली. बंगाल आणि बिहारमधील कारागीर व विणकरांनी बनवलेल्या घरगुती शोभेच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री हे या कंपनीचे ध्येय आहे. या कंपनीत 45 स्त्रिया काम करतात आणि कंपनी प्रगतिपथावर आहे.

वरील काही उदाहरणे तपासून पाहिल्यास महिला उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि पूरक सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पाठबळ लाभल्यास काय होऊ शकते, हे पाहायला मिळते. आजघडीला उद्योजक उत्तमोत्तम, नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन बाजारात येत आहेत. जीवनशैलीत घडून येणार्‍या वेगवान बदलामुळे या संकल्पनांना चांगला प्रतिसाद मिळणे अवघड नाही. गरज आहे ती इतर महिलांनी जोमाने पुढे येण्याची. दुसर्‍या बाजूने स्टार्ट अप्सना उदार होऊन सहकार्य करणार्‍या गुंतवणूकदारांची मदतरुपी गुंतवणूक या नवउद्यमशीलला लाभणेही महत्त्वाचे आहे. अनंत समस्यांचा मुकाबला करत भारतात महिलांचे नवोद्योग फोफावत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढील काळात त्यात भरीव वाढ होवो, हीच अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या