Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारअत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना सर्व दिवस नियमित वेळेत सुरु

अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना सर्व दिवस नियमित वेळेत सुरु

नंदुरबार – Nandurbar :

- Advertisement -

जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ३.३१ टक्के असून ऑक्सिजन बेडस् व्यापलेली टक्केवारी २९.४३ टक्के इतकी आहे.

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार दुसऱ्या स्तरात समाविष्ट होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी काही निर्बंध शिथिल केले आहेत.

त्यानुसार अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना उद्या दि.७ जूनपासून आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. यामुळे सदर निर्णयाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित व त्याव्यतिरीक्त इतर सर्व दुकाने आस्थापना सर्व दिवशी नियमित वेळेत पूर्ण सुरु राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह, रेस्टॉरंट आसनाच्या ५० टक्के क्षमतेसह सुरु राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी, खुली मैदाने सर्व दिवशी नियमित वेळेत सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे.

सर्व खासगी आस्थापना देखील नियमित वेळेत सुरु ठेवण्यासाठी सूट देण्यात आली आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालय १०० टक्के कर्मचारी उपस्थितीसह सुरु राहणार आहेत. मैदानी खेळांना पूर्णवेळ सूट देण्यात आली आहे. तर इनडोअर खेळांना सर्व दिवशी सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय लग्न समारंभ हॉलमधील आसनाच्या ५० टक्के क्षमतेसह परंतू १०० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक असणार आहे.

बैठका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेसह होणार आहेत. यासोबतच बांधकाम, कृषी व कृषीपूरक सेवा, ई-कॉमर्स- वस्तू व सेवा नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू राहणार आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेसह सुरु असले तरी सदर ठिकाणी लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के क्षमतेसह सुरु राहणार आहे. माल वाहतूक, आंतरजिल्हा वाहतूक, खासगी वाहने, टॅक्सी, बसेस नियमित सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. आंतरराज्य सीमा, खासगी कोचिंग क्लासेस, मोठ्या प्रमाणावर होणारे संमेलनांना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेश लागू राहणार आहेत.

दरम्यान, कोविड मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या