सरिता पगारे
नेहेमीप्रमाणे नवीन केससाठी शेवटची अपॉईटमेंट दिली होती. एक 55 वर्षांच्या बाई आत आल्या.
मी : बसा (अत्यंत नेटनेटक्या, छानसा ड्रेस, स्मार्ट हेअरकट..पाहताक्षणी छाप पडावी असे आकर्षक व्यक्तिमत्त्व. मला प्रश्न पडला काय बरे समस्या असेल यांची? डोळ्यांत बेचैनी जाणवत होती. त्यांनी बाजूच्याच खुर्चीवर पर्स ठेवली.)
मी : बोला, कशा आहात?
त्या : मॅडम खरे सांगायचे तर मी बरीच आहे. पण कसे सांगू? म्हणजे बघा मला तसा काहीच प्रॅाब्लेम नाही. मी बँकेत नोकरी करते. माझे मिस्टर एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर आहेत. त्यांचेही अगदी छान चालू आहे. दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत, त्या दोघांचे उत्तम चालू आहे.
(मी मनात शब्दांची नोंद घेते होते. मुलांचे उत्तम चालू आहे, मिस्टरांचे छान चालू आहे, आणि मी तशी बरीच आहे.)
मी : बरे मग?
त्या : मॅडम, मला ना खूप अस्वस्थ वाटते.
मी : तुम्हाला काही बी.पी. किंवा शुगर आहे का?
त्या : नाही हो मॅडम काहीच नाही. तुम्हाला सांगते, मी ना भरपूर व्यायाम करते. माझे खाणेही योग्य असते. तशी मी माझी आणि सगळ्यांची खूप काळजी घेते. आमच्याकडे सगळे एकदम फिटनेस वेडे आहेत.
मी : बरे मग ?
त्या : म्हणजे बघा, माझा स्वभाव तसा सरळ स्पष्ट बोलण्याचा आहे. मला उगाच खोटे खोटे वरकरणी बोलता येत नाही. मला वाटते त्यामुळेच माझ्याशी जास्त कुणी बोलत नसावे. मला मैत्रिणी कमीच आहेत. त्या ना खूप स्पर्धा करत असतात. माझी बहीण मला नेहमी म्हणते, तुझे कसे सगळे छान आहे. तिला वाटते, मला कशाची चिंता नाही, आर्थिक सुबत्ता आहे. तिला मात्र सगळे कष्टाने मिळते म्हणून ती माझा हेवा करते. इतर नातेवाईकांना पण असेच वाटते बहुदा. माझ्या पुतणीच्या लग्नात मी एवढे केले मॅडम, पण त्याचे कुणालाच कौतुक नाही. मुलांना काही शेअर करू शकत नाही. चुकून केलेच तर ते म्हणतात, तू ना अगदी त्या डेली सोप सीरिअलमधल्या बायकांसारखी विचार करतेस. किती टिपीकल आहेस गं तू! असा बर्याच तक्रारींचा पाढा त्या वाचत राहिल्या. लहानपणापासूनचे बरेच काही मनात साचलेले होते. एकूणच सगळ्यांबद्दल मनात कटूता होती. जुन्या त्रासदायक आठवणींनी मनात खोल ठिय्या मांडला होता.
इथे समस्या बाह्य परिस्थितीमध्ये दिसत नव्हती. बाह्य दर्शनी सगळेच छान आहे, पण आत मात्र इतका नकारात्मक विचारांचा ढीग झाला होता आणि खूप दिवसांपासून साचल्याने त्याची दुर्गंधी पसरत होती. त्याचा निचरा झाल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणार नाही हे मला कळत होते. मग मला आठवला तो तुकाराम महाराजांचा अभंग
चित्त शुध्द तरी शत्रू मित्र होती।
व्याघ्रही न खाती सर्प तया॥1॥
विष अमृत आघात ते हीत।
अकर्तव्य नीत होसी त्यांस॥2॥
दुःख ते देईल सर्व सुख फळ।
होतील शितल अग्नी ज्वाळा ॥3॥
आवडेल जीवा जीवाचिये परी ।
सकाळां अंतरी एकची भाव॥4॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे ।
जाणिजे ते येणे अनुभवे ॥5॥
या अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात,
मन शुद्ध, द्वेषरहीत निर्मळ असेल तर प्रसंगी शत्रूही मित्र होऊ शकतात नाग, सर्प, वाघ यांसारखे हिंस्र प्राणी आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत. शुद्ध निर्मळ अंतःकरणामुळे विषारी भावदेखील अमृता समान होतात.
मग हे निर्मळ मन म्हणजे काय? तर एकूणच अतिराग, द्वेष, मत्सर, दुजाभाव, असुया, हेवेदावे, नकारात्मक स्पर्धा, वाईट विचार, एखाद्याबद्दल वाईट चिंतणे अशा विचारांना मनातून हद्दपार करून मनाची स्वच्छता करणे आणि मनात प्रेम, सद्भावना, क्षमाशिलता या भावनांना जागा करणे.
आज आपण सगळे आपल्या शारीरिक आणि परिसरातील स्वच्छतेबद्दल कितीतरी जागरुक आहोत, करोनाकाळ अनुभवल्यानंतर तर जास्तच जागरुक झालो आहोत. घरातील स्वच्छता, नको असलेल्या वस्तू वेळेत कुणा गरजूला देणे, आपले घर नीटनेटके, सुटसुटीत, आवरलेले (ऑर्गनाईज्ड) असणे याकडेही आपण लक्ष देतो. त्याचे महत्त्वही जाणतो. पण मग मनाचीही अशी स्वच्छता करावी हा विचार मनात येतो का? त्या मनाच्या स्वच्छतेचे काय? आपले आयुष्य कितीही सुरळीत चालू असले, शरीर सुदृढ असले तरी मन हे तितकेच महत्त्वाचे आहे किंबहुना जास्तच. हा मानसिक कचरा आपल्या विचारशक्तीवर, मानसिक स्वास्थ्यावर आणि पर्यायाने आपल्या वर्तणुकीवर परिणाम करत असतो. त्यातून पुढे नैराश्य, ताण यासारखे मानसिक आजार उद्भवू शकतात. मनाची स्वच्छता रोज करणे गरजेचे आहे.
कशी करायची ती?
मन आहे त्यामुळे अनेक नकारात्मक भावना कधी ना कधी डोकं वर काढणारच, पण मग त्याचा मनात शिरकाव होऊन कायमस्वरुपी मनात त्यांनी जागा करू नाही यासाठी मास्क कसा लावायचा? कोणते सॅनिटायझर लावायचे? याचा विचार करूया.
रोज आपल्या दिवसभरातील कोणत्या भावनेमुळे काय त्रास झाला? याचा विचार करून कुठे आपण सोडून दिलेले नाही (श्रशीं से), काय नको ते धरून ठेवले आहे यावर काम करावे. सतत वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करावा. जुने विचार, त्रासदायक आठवणी याची नोंद करावी. कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींशी मोकळा संवाद साधावा. मनाच्या स्वच्छतेचा, व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे 30 मिनिटे चालणे, पोहोणे, सायकलिंग इ. व्यायाम आपल्या दिनचर्येचे असणे गरजेचे आहे. ध्यानधारणा, योगासने यांचा सराव करावा.
स्वत:च्या आणि इतरांच्या चुकीला माफ करण्याची सवय लावून घेणे.
सहअनुभुतीचा विचार करणे. परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर उपाय शोधणे.
दिवसभरात एखादा तास तरी मौन पाळावे. प्रसंगी समुपदेशक थेरपिस्ट यांची मदत घ्यावी. कारण मनाची मशागत नीट झाली तर आनंदाचे पीक येणारच आणि स्वस्थ, शांत मन असले की प्रत्येक प्रश्न सहज सुटतो हीच मनाच्या स्वच्छतेची शक्ती आहे.