पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
ईव्हीएमविरोधात राज्यात पहिले आंदोलन पाथर्डी येथे झाले. येथील तहसीलसमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, गुजरातवरून ईव्हीएम मशीन आणून आमचा गेम केला. आता मराठी माणूस अभ्यास करूनच येणार्या प्रत्येक निवडणुकीत सावधगिरीने तुमचा गेम हाणून पाडेल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी महायुतीला लगावला आहे.
ते पाथर्डी येथील अॅड. प्रताप ढाकणे यांच्या आभार सभेत बोलत होते. दरम्यान, सभेनंतर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे पाथर्डी तहसील कार्यालयासमोर दहन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगा विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले. वीर सावरकर मैदानापासून पायी मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन विरोधात निदर्शन केले गेले. यावेळी अॅड. ढाकणे, राणी लंके, शिवशंकर राजळे, योगीता राजळे, सविता भापकर, माधव काटे, सुभाष केकाण, बंडू बोरूडे, राजेंद्र दौंड, नासिर शेख, सचिन नागपुरे, वजीर पठाण, रामराव चव्हाण, हरिष भारदे, देवा पवार, चंद्रकांत भापकर, अतिष निर्हाळी, राहुल ढाकणे, बद्री बर्गे आदी उपस्थित होते.
आ.पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या बाजूने संपूर्ण राज्यात जनमत असताना हा ‘ईव्हीएम’चा धक्कादायक निकाल आहे. मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसर्या फेरीत महाविकास आघाडी आघाडीवर होती. त्यानंतर पिछाडीवर गेलो. या निकालात मोठी गडबड झाली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम, जातिवाद, धर्मवाद याचा भाजपने मोठा व्हायरस पसरवला. पोटाला अन्न आणि हाताला काम यावर भाजपाचा एकही नेता शब्द काढत नसून शेतकरी, युवा, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राज्याला विभागून टाकत सत्तेत येण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद भाजपने पेटवला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ढाकणे म्हणाले, मला लोकांनी निवडून दिले मात्र मी तांत्रिकदृष्ट्या पराभूत झालो आहे. ईव्हीएम मशीनव्दारे भाजपने या निवडणुकीत घोटाळा केला असून हा लोकशाहीवर मोठा घाला आहे.