मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात जोरदार टीका केली. योगेश कदम यांच्या कथित गैरव्यवहारांची आणि गुन्हेगारांना मदत करण्याच्या प्रकरणांची तक्रार घेऊन थेट लोकायुक्तांकडे जाणार असल्याचा मोठा निर्णय अनिल परब यांनी जाहीर केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे खेडच्या सभेत बोलले होते योगेश मी तुझ्या पाठीशी आहे
राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आपल्यासमोर ठेवले आहेत. एवढे होऊन देखील पुराव्यासकट सर्व प्रकरणे राज्याच्या जनतेसमोर आणि विधान परिषदेच्या माध्यमातून सरकार समोर ठेवली. परंतु मुख्यमंत्र्यांची अडचण मला माहीत नाही. कारण त्यांनी प्रत्येकवेळी त्यांना (योगेश कदम) पाठीशी घातले. मंत्र्याने काही केले तरी चालते, आमचे त्यांना अभय आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत सांगितले होते की, योगेश कदम मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करायचे कारण नाही. जेव्हा राज्याचा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पाठी असण्याची भावना तयार झाल्यानंतर गृहराज्य मंत्र्याने राज्यात जे थैमान घातले आहे, त्याचा पुरावा राज्याच्या जनतेसमोर आला आहे, अशी माहिती परब यांनी दिली.
पुणे पोलिसांनी परवाना नाकारला होता तरी
अनिल परब पुढे म्हणाले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला. पुणे पोलिसांनी हा परवाना नाकारला होता. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते. परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले. पुणे जिल्ह्यात आज ७० टोळ्या सक्रीय आहेत. निलेश घायावळचा भाऊ सचिन घायावळ याच्यावर खंडणी, खूनासारखे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता सचिन घायावळ याला शस्त्र परवाना नाकारला परंतु गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्र लिहून हा शस्त्र परवाना मिळवून दिला. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला.
पोलिसांचे ध्यर्यखच्चीकरण करण्याचं काम
तसेच पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला असताना गृह राज्यमंत्री परवाना देतात. त्यातून पोलिसांचे ध्यर्यखच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केले. उद्या दाऊद मुंबईत आला, तो दोषमुक्त झाला तर त्यालाही परवाना देणार का? डान्सबार, वाळू उपसा आणि आता हा शस्त्र परवाना प्रकरण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. पोलिसांनी परवाना का नाकारला याची कारणे तपासली जातात. हा गुंड आहे. गुंडाचा भाऊ असून पुण्यात दहशत आहे. त्याच्यावर खूनाचे, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे आहेत असं पोलिसांनी सांगितले. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या गुंडांना शस्त्र परवाना देताना एकतर आर्थिक मोबदला घेतला असेल किंवा भविष्यात माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावे लागेल असे सांगून हा परवाना दिला असेल असा आरोपही अनिल परब यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून असे मंत्री का आहेत
यावेळी अनिल परब म्हणाले माझे मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार आहात? जे आईच्या नावाने डान्सबार चालवतात. मुली नाचवून जे लोक भाडे खातात, दलालीचे काम करतात. गँगस्टर लोकांना पोसण्याचे काम करत आहेत. अधिकृत शस्त्र परवाने या गँगस्टर लोकांना देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून असे मंत्री का आहेत, त्यांची कोणती अडचण आहे हे समजत नाहीये? असा सवाल अनिल परब यांनी केला.
मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा
योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अधिवेशनात आम्ही आवाज उचलू मात्र जर योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
योगेश कदमांचे प्रकरण घेऊन लोकायुक्तांकडे जाणार
योगेश कदम यांचे डान्सबार, वाळूचोरी आणि अन्य प्रकरणं घेऊन मी लोकायुक्तांकडे जाणार आहे. तसेच, कोर्टात जाणार आहे. कोर्टाने चूक दुरुस्त करावी. अन्यथा मला कोर्टात जाण्यावाचून पर्याय राहणार नाही. पोलिसांचा रिपोर्ट आहे. तो गुंड आहे. गुंडाचा भाऊ आहे. समाजविरोधी कृत्यात तो आहे. म्हणून आम्ही परवाना नाकारत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी नाकारला त्याच ग्राऊंडवर (आधार) कदम यांनीही परवाना नाकारायला हवा होता, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





