मुंबई | Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर गाठीभेटी, मुलाखती, दौरे,पक्षप्रवेश यांना वेग आला आहे.त्यात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असून अनेक मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. त्यानंतर येत्या १४ तारखेला अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे.यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दुहेरी धक्का बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल(मंगळवारी) मोदी बागेत सकाळी राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) गाडीत जाताना शिंगणे यांनी आपला चेहरा फाईलने लपवला होता.नुकतीच शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांची साथ सोडून शिंगणे तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी वर्ध्यामध्ये बोलतांना शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत का गेलो याचे कारण सांगितलं होते. ते म्हणाले होते की, मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता कालच्या राजकीय घडामोडीनंतर ते पुन्हा शरद पवारांसोबत येतील अशी चर्चा आहे.