श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जादा परताव्याचे अमिष दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांना आपल्या जाळ्यात ओढणार्या श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील त्या ‘इन्व्हेस्टर’ने आपल्या कारभाराची जागा काही दिवसांसाठी श्रीरामपूर येथे हलविली आहे. एका निनावी पत्राने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याने खबरदारी म्हणून त्याने ही काळजी घेतली आहे.
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात एका अलिशान बंगल्यात या ‘इन्व्हेस्टर’ कंपनीने आपले कार्यालय थाटले आहे. त्यासाठी एका पंथाचा आधार घेण्यात आला असून आपल्या पंथाचे प्रमुख जबाबदार व्यक्तीवर विश्वास ठेवून अनेकजण या कंपनीत गुंतवणूक करीत आहेत. या ‘इन्व्हेस्टर’ कंपनीच्या बॉस (मालक) ला भेटायचे असेल तर आधी त्यांची परवानगी व वेळ घ्यावा लागतो. शिवाय या अलिशान बंगल्यात कुणीही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. या प्रवेशद्वारावर असलले दोन बाउन्सर रखवालदार संपूर्ण चौकशी करतात.
नंतर इंटरकॉम वरुन आत बसलेले ‘बॉस’ ला कोण आले व काय काम आहे ते सांगतात. ‘बॉस’ ला वाटले तरच ते भेटायला येणार्या व्यक्तीला परवानगी देतात. आत जाताना प्रत्येकाचा मोबाईल प्रवेशद्वारवरच जमा करावा लागतो. पुढे गेल्यावर आणखी दोन बाऊन्सर चा पहारा पार करुन या बॉस च्या अलिशान ऑफीस मध्ये प्रवेश मिळतो. आमदार, खासदार काय एखाद्या मंत्र्याला नाही असे अलिशान ऑफीस या बंगल्यात आहे. हा व्यावसाय अधिकृत असल्याचा आव ही मंडळी आणतात. तर मग एवढी कडक सुरक्षा कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कथेच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागात फिरणारे एका पंथाचे प्रमुख या ‘इन्व्हेस्टर’ला गिर्हाईक (ठेवीदार) आणून देतात. त्यात केवळ अहिल्यानगर जिल्हा नव्हे तर बीड, जालना जिल्ह्यासह अनेक भागातील पंथाचे लोक या जादा परताव्याच्या अमिषाला बळी पडले आहेत. या कंपनीच्या कारभाराची माहिती एका गुंतवणूकदाराने निनावी पत्राद्वारे केली आहे. ही कंपनी पूर्वी शिर्डी येथील बहुचर्चीत ‘ग्रो मोअर’ कंपनीचीच एक भाग होती. शिर्डीत गुन्हा दाखल होण्यापूर्वी बाजुला होवून त्यांनी श्रीरामपूरच्या पूर्व भागात ही ‘इन्व्हेस्टर’ कंपनी सुरु केल्याची माहिती आहे.
ही तक्रार पोलीस प्रशासनापर्यंत पोहचली. त्यानंतर दोनच दिवसात या कंपनीने आपल्या आलिशान बंगल्यातील कार्यालयातील काही माल श्रीरामपूर येथे या कंपनीच्या मालकाची मालमत्ता असलेल्या बोरावके कॉलेज मागील वसाहतीत असलेल्या अलिशान बंगल्यामध्ये हलविली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी कुठलीही ठोस कारवाई केल्याचे उघड झाले नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेविषयीही संशय व्यक्त केला जात आहे. तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी यात लक्ष घालून सर्वसामान्यांची होणारी संभाव्य फसवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.





