Sunday, May 19, 2024
Homeधुळेपारंपरिक नृत्यातून मिळाली आदिवासी संस्कृतीची अनुभूती

पारंपरिक नृत्यातून मिळाली आदिवासी संस्कृतीची अनुभूती

धुळे । Dhule प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील मोहगावच्या (Mohgaon) रमण गवळी यांच्या पथकाचे ढाक नृत्य, (Dhak dance) विजयपूरच्या हिरामण वंजी चौरे यांच्या पथकाचे टिपरी नृत्य (Tipari dance), शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील दशरथ हसर्‍या पावरा यांच्या पथकाचे होळी नृत्य, मोहगावच्या उत्तम निंबा देशमुख यांच्या पथकाचे पेरणी नृत्याने (Sowing dance) आदिवासी संस्कृतीची अनुभूती (Experience of tribal culture) उपस्थितांना मिळवून दिली. निमित्त होते, आदिवासी विकास विभागातर्फे (Department of Tribal Development) आयोजित प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे (Project Level Tribal Traditional Dance Competitions).

- Advertisement -

आदिवासी विकास विभागाच्या धुळे प्रकल्पस्तरीय स्पर्धा आज धुळे येथे पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर आदी उपस्थित होते.

डॉ. रंधे म्हणाले, जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत आणि साक्री तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. आदिवासी बांधव विविध सण उत्साहात साजरे करतात. यानिमित्त ते विविध वाद्यांच्या गजरात नृत्य करतात. आदिवासी बांधवांचे नृत्य, संस्कृती हा अमूल्य ठेवा आहे. त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने आयोजित कार्यक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. या नृत्य स्पर्धेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले, आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्य कलेला प्रोत्साहन देत तिच्या संवर्धनासाठी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांमार्फत प्रकल्पस्तरीय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने निधी उपलब्ध करून दिला आहे. सहभागी प्रत्येक कलाकारास एक हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बचत खात्यावर अदा करण्यात येणार आहे. आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातून नऊ पथके सहभागी झाली होती. त्यात साक्री तालुक्यातील सहा, शिरपूर तालुक्यातील दोन, तर शिंदखेडा तालुक्यातून एका पथकाचा समावेश होता. त्यात मोहगावच्या उला भिका ठाकरे यांच्या पथकाने डोंगर्‍यादेव नृत्य, मोहगावच्या धेडू सोमिरा गायकवाड यांच्या पथकाचे पावरी नृत्य, मोहगावच्याच शांताराम बुधा मोरे यांच्या पथकाने ठाकरी नृत्य, दोंडवाडे येथील रवींद्र सुरमन पावरा यांच्या पथकाने आदिवासी लोककला, शेवाडेच्या देवीदास नारायण मोरे यांच्या पथकाने लग्न नृत्य सादर करीत उपस्थितांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. भगवान वळवी, तुषार मोरे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या