Tuesday, January 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजफुग्यात गॅस भरणार्‍या सिलेंडरचा स्फोट; पाच जण जखमी

फुग्यात गॅस भरणार्‍या सिलेंडरचा स्फोट; पाच जण जखमी

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत असतांना येथील कॉलेज स्टॉप परिसरात फुगे फुगविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने दोघा महिलांसह पाच जण गंभीररित्या जखमी झाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्फोट होताच मोठा आवाज होवून धुर पसरल्याने एकच खळबळ उडून बॉम्बस्फोट झाल्याच्या भितीने नागरीकांची एकच पळापळ झाली. पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत फुगे भरण्यासाठी वापरले जात असलेल्या सिaलेंडरचा स्फोट झाल्याचे स्पष्ट करताच नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

YouTube video player

दरम्यान, कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुगे भरण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करीत असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याविरूध्द अटकेची कारवाई केली आहे.

कॉलेज रोडवरील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते पार पडला. देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायत असल्याने या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालक परत जात असतांना कॉलेज स्टॉपलगत रस्त्याच्या कडेस फुगे विकणारे विक्रेते उभे होते. सिलेंडरमधून अ‍ॅसीटिलीन गॅस भरून फुगे फुगवत ते विक्री करत होते.

सिलेंडरचे तुकडे उडाल्याने उज्वला पंकज महाजन (२५, रा. एकता नगर, सोयगाव), प्रमिला निंबा जाधव (४३, रा. नाशिक), विनोद थोरात (४५, रा. सोयगाव), अतुल शेवाळे (४३, रा. सोयगाव) व मोहित योगेश जाधव (१५, रा. सोयगाव) हे पाच जण गंभीररित्या जखमी झाले. तर रस्त्याने त्यावेळी जात असलेल्या महिला व नागरीक किरकोळ जखमी झाले. अचानक स्फोट घडून मोठा आवाज झाल्याने बॉम्बस्फोट झाल्याच्या भितीने रस्त्यावरील नागरीकांची एकच पळापळ सुरू झाली.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, सहाय्यक पोलीस अधिक्षक दर्शन दुग्गड, सपोनि योगेश पाटील या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित केले. अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रांत नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे हे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्या पाचही जणांना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात हवालदार योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरून मोहंमद सादीक मतलुब अहमद (३३), मतलुब अहमद बशीर अहमद (६३) व मोहंमद माजीद मतलुब (२०, रा. तिघे रा. रमजानपुरा, मालेगाव) यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

शासन निधीतून जखमींवर उपचार
फुगे भरण्यासाठी वापरले जात असलेल्या गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात दोघा महिलेंसह गंभीररित्या जखमी झालेल्या पाच जणांवर नाशिक येथे रूग्णालयात उपचार केले जात आहे. या घटनेची गंभीरतेने दखल घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा करून परिस्थितीची माहिती देत जखमींच्या उपचाराचा संपुर्ण खर्च शासनाने उचलावा अशी विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्यासह इतर शेतीमालाचे लिलाव उत्साहात पार पडले. यामध्ये कांद्याला (Onion) प्रति क्विंटल...