मुंबई । Mumbai
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवले आहे. जनता दल युनायटेड आणि भाजपच्या युतीने विधानसभेत २०२ जागा जिंकून सत्ता राखली. याउलट, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालासारखाच एकतर्फी ठरला आहे, जिथे महायुतीने मोठे यश मिळवले होते.
बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणुकीतील सरकारी योजना आणि पैशांचे वाटप यावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रात जशी ‘लाडकी बहीण’ योजना आहे, तसे बिहारमध्येही पैशांचे वाटप करून निवडणूक होत असेल, तर निवडणूक आयोगाने याचा विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी ‘जो जिता वही सिकंदर’ या म्हणीचा आधार घेत विरोधकांना पराभव स्वीकारण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. फडणवीस म्हणाले, “जो जिता वही सिकंदर. हरल्यानंतर पराभव मोकळ्या मनाने स्वीकारता आला पाहिजे. आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे विरोधी पक्षाला मान्य नाही.”
सरकारी योजनांचा निवडणुकीवर परिणाम होतो, या विरोधी पक्षांच्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या योजना आणण्याची संधी सर्वांना होती. त्यांचे (विरोधकांचे) सरकार होते, तेव्हा त्यांनाही संधी होती. त्यांनी योजना केल्या नाहीत, आम्ही योजना आणल्या. त्या योजना लोकांना आवडल्या, म्हणून लोकांनी आम्हाला मतदान केले. यात लोकांना दोष देण्याचे कारण काय?” आत्मपरीक्षण न केल्यास भविष्यात विरोधी पक्षांची राजकीय स्थिती आणखी बिघडेल, असे थेट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. “जोपर्यंत ते (विरोधी पक्ष) आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत ते मातीत जाणार,” असे कठोर शब्द वापरत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या कारणांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “राज्यातल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली असावी,” एवढेच उत्तर त्यांनी दिले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीवर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत आहे. त्यावर लवकरच मी एक बैठक आयोजित करणार आहे, जेणेकरून या समस्येवर तोडगा काढता येईल.”
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, यावरही फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “विरोधी पक्ष एकत्र लढतोय की, स्वतंत्र लढतोय, यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, “महायुती निश्चितपणे निवडून येईल.”




