Thursday, October 15, 2026
Homeराजकीयअमित शाहांच्या विधानावर विरोधकांची टीका; CM फडणवीस म्हणाले, 'पूर्ण भाषण ऐकलं असतं...

अमित शाहांच्या विधानावर विरोधकांची टीका; CM फडणवीस म्हणाले, ‘पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं…’

मुंबई । Mumbai

नवी मुंबईतील राजभाषा संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला वादाचा धुरळा अधिकच घट्ट झाला आहे. अमित शाहांच्या विधानावर विरोधकांनी सोडलेल्या बाणांना आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधकांनी अमित शाहांचे भाषण पूर्ण ऐकले असते तर त्यांची थोबाडं काळी झाली असती,” अशा तिखट आणि थेट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

- Advertisement -

नवी मुंबईत पार पडलेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी हिंदीविरोधावर भाष्य करताना, महाराष्ट्र ही सर्वात मोठी बहुभाषी भूमी असल्याचे नमूद केले होते. “मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्यास विरोध करणारे पाप करत आहेत,” असे शाह म्हणाले होते. या वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…” अशी अत्यंत मोजक्या शब्दांतील सोशल मीडिया पोस्ट करत अप्रत्यक्षपणे टोला लगावला, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शाहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. शाहांनी महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्थान कसे सर्वोच्च आहे आणि मातृभाषेचे महत्त्व काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले होते. महाराष्ट्रातील नागरिक बहुभाषिक आहेत याचा अर्थ कुणाची मातृभाषा बदलते असा होत नाही. केवळ सोयीस्कर (सिलेक्टिव्ह) ऐकायचे आणि त्यावर राजकीय पोळ्या शेकायच्या, ही पद्धत योग्य नाही. विरोधकांनी पूर्ण भाषण ऐकले असते तर अशी चुकीची टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावरही भूमिका स्पष्ट केली. मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव हा अत्यंत मोठा उत्सव असतो, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी त्यांनी पुन्हा अर्ज केला आहे, ज्यावर गुणवत्तेच्या (मेरीट) आधारावर योग्य निर्णय घेतला जाईल. सरकारने जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून काही बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या नव्या एफआयआरवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी संयम बाळगला. “मी अद्याप एफआयआर पाहिलेला नाही, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने ही कारवाई केली आहे. त्यामुळे या विषयावर आपण आधीच कोणतेही तर्कवितर्क लढवणे योग्य ठरणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : दिंडोरी तालुका लवकरच दुष्काळग्रस्त घोषित होणार –...

0
ओझे | विलास ढाकणे | Oze राज्य सरकारने महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत दुष्काळ जाहीर केला असला तरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक हे दोन तालुके...