अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी योगेश बबन बनकर (रा. भिंगार) याला तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून त्याला नोटीस देऊन रात्री सोडून दिले होते. दरम्यान, मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला आहे. सदरचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांना हाताशी धरून चौघांनी कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान योगेश बनकर याचे नाव निष्पन्न झाले होते. मंगळवारी दुपारी त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला गुन्ह्यात अटक केली नव्हती.
गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला नोटीस देत सोडून दिले होते. तो त्याच्या भिंगार येथील घरी गेल्यानंतर मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. सदरचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या मृत्यू प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.