Thursday, July 4, 2024
Homeनगरबनावट दस्तावेज करून जमीन बळकावल्याबद्दल गुन्हा दाखल

बनावट दस्तावेज करून जमीन बळकावल्याबद्दल गुन्हा दाखल

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील दिधी येथील गट नंबर 191 क्षेत्र 2 हेक्टर 23 आर ही मिळकत बनावट दस्तावेज करुन बळकविल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुंमत सदानंद भक्त यांच्या वडीलोपार्जित मालकीची जमीन आरोपी शोभा वसंत बर्वे, कुणाल वसंत बर्वे, अमित वसंत बर्वे, बाजीराव देवराव बर्वे, साहेबराव देवराव बर्वे यांनी फिर्यादीची आई रत्नमालाबाई या आनंदऋषी हॉस्पिटल, अहमदनगर येथे मयत झाल्या असताना त्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथे मयत झाल्याचे दाखवून कोल्हार ग्रामपंचायत यांचा बनावट मृत्युचा दाखला बनविला. त्याचप्रमाणे 1997 सालचे खोटे मृत्यूपत्र तयार करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. याप्रकरणी फिर्याद सुमंत भक्त यांनी नेवासा येथील न्यायालयात दाखल केलेली होती. त्याबाबत पोलीस तपास होऊन जबाब झाले. न्यायालयाने सदर केसेची गुणदोषावर चौकशी करुन आरोपी विरुध्द भा. दं. वि. कलम 420, 463, 464, 465, 468, 471 व 34 नुसार सदरची केस चालविण्याचा आदेश दिला.

फिर्यादीचे वडील सदानंद हे 1968 साली मयत झाल्यानंतर सदर मिळकतीच्या मालकी हक्कात फिर्यादीची आई रत्नमाला यांचे नाव लागले. इतर हक्कात फिर्यादीचे नाव लागले. फिर्यादीची आई ही नोकरीस असल्यामुळे तिची विविध ठिकाणी बदली होत असल्याने त्यांना सदरची मिळकत स्वतः वहीत करता आली नाही. म्हणून तिने जमीन करण्याकरिता भाऊबंद यांना दिली होती. ते जमिनीतील उत्पन्नाचा हिस्सा दरवर्षी देत होते. त्यामुळे सदर मिळकतीकडे फिर्यादीची आई व फिर्यादी यांनी लक्ष दिले नाही. कागदपत्राची कधीही पडताळणी केली नाही. दरम्यान दि. 7 एप्रिल 2021 रोजी फिर्यादीची आई ही आनंदऋषी हॉस्पीटल, अहमदनगर येथे मयत झाली.

त्याबाबतचा मृत्युचा दाखला अहमदनगर महानगरपालिका यांनी फिर्यादीस दिला. परंतू आरोपी यांनी कोल्हार बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा बोगस मृत्युचा दाखला, खोटे शिक्के तयार करून व सन 1997 सालचे बोगस मृत्यूपत्र तयार करुन मिळकतीस आरोपी शोभा बर्वे, कुणाल बर्वे आणि अमित बर्वे यांची नावे लावुन घेतली. त्यास आरोपी बाजीराव बर्वे व साहेबराव बर्वे यांनी मदत केली. याबाबतची प्रोसेस इश्यु करुन फौजदारी केस आरसीसी नंबर 722/2024 नुसार केस चालविण्याचा आदेश न्यायालयाने केलेला आहे. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सादीक शिलेदार यांनी कामकाज पाहिले, त्यांना अ‍ॅड.आय.आर. काझी, अ‍ॅड.आर.बी. पंडीत यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या