कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील मुर्शतपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांना तोतया पत्रकाराकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून बातमी न लावण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 2 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी अर्जुन गुरुळे हे कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानात दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ आरोपी नामे नवनाथ पांडुरंग वाघ याने त्यांना अडवले. यावेळी वाघ यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत, बातमी लावायची नसेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. फिर्यादी गुरुळे यांनी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात? असा सवाल केल्यावर वाघ संतापून शिवीगाळ करू लागले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने त्रस्त झालेल्या अर्जुन गुरुळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत वाघ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पैशांची मागणी, शिवीगाळ व दमबाजीसंबंधी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
कोपरगाव तालुका परिसरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याची माहिती मिळते आहे. अवैध व्यवसाय करणार्यांकडून व्हिडिओ काढून पैसे उकळणे, खोट्या ओळखपत्रांचा वापर करून अधिकार्यांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. याबाबत तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाने यापूर्वीच संबंधित कार्यालयांना अधिकृत पत्रकारांची यादी दिली असून तोतया पत्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.





