नाशिक | प्रतिनिधी
बनावट शालार्थ आयडीद्वारे आर्थिक गैरव्यवहार करत फसवणूक के ल्याप्रकरणी राज्यभरात गाजत असलेल्या घोटाळ्यातील ‘बडा मासा’ म्हणून नाव चर्चेत आलेला नाशिकचा तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याला न्यायालयाने गुरुवारी (दि.४) चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, याच प्रकरणात फिर्याद दाखल करणारा शिक्षण उपसंचालक संशयित भाऊसाहेब चव्हाण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला आहे. पोलिसांनी त्याला उपासनीसोबत सहसंशयित केले असून ‘अटकपूर्व’चा सहारा घेऊनही त्याला यश न आल्याने त्याची अटक आता अटळ आहे. शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके आणि पथकाने अमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील यांना अटक केली होती.
त्याचदरम्यान नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी वरील गुन्ह्यातील संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करून गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष पुराव्यांत फेरफार करून छेडछाड केली. ही धक्कादायक बाब उघड झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यांनी गिरी यांना काही दिवसांपूर्वीच निलंबित केले आहे. आता या गुन्ह्यातील सूत्रधार व सहसंशयितांना अटक झाल्याने गिरी यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.
दरम्यान, उपासनीला अटक करून पथकाने गुरुवारी (दि. ४) दुपारी न्यायालयात हजर केले. तेव्हा पथकाच्या वतीने सरकारी अभियोक्त्यांनी युक्तिवाद करून उपासनी यांच्याकडे सखोल तपास करण्यासाठी व पुरावे संकलित करून विविध जबाब नोंदवण्यासाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
फिर्यादीच आरोपी !
मे-जून २०२५ मध्ये नाशिकचे शिक्षण उपसंचालक असलेल्या भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वरील गुन्हा नोंद आहे. एकूणच हा घोटाळा दडवण्यासाठी चव्हाण याने फिर्याद दाखल केल्याचे समोर आले आहे. तर तपासात भाऊसाहेबचा थेट संबंध उघड होत असल्याने याच गुन्ह्यात त्याचे नाव सामाविष्ट करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे परवानगीचा अर्ज सादर केला आहे. सध्या भाऊसाहेब पसार असून आर्थिक गुन्हे शाखा त्याच्या अटकेचे प्रयत्न करत आहे.
दृष्टिक्षेपात
आर्थिक गुन्हे शाखेकडून साखळी पद्धतीने तपास
अटकेतील संशयितांचे जबाब व पुराव्यानुसार उपासनी गोत्यात
तब्बल दहा कोटींहून अधिक घोटाळ्याचा संशय
अटक टाळण्यासाठी उपासनीकडून अनेक मध्यस्थी
घोटाळ्याची पाळेमुळे पुणे आणि मंत्रालयापर्यंत
भाऊसाहेब चव्हाणचा अटकपूर्व फेटाळला
केव्हाही अटक होण्याची शक्यता
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




