मुंबई l Mumbai
सुप्रासिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. सांगलीजवळच्या दूधगावात वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.
इलाही जमादार यांना मराठीतील ‘गझल ए-कोहिनूर’ असंही त्यांना म्हटलं जायचं. इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ साली सांगतीलीत दुधगावात झाला.
लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत. इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते.
विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठीची गझल कार्यशाळा ते घ्यायचे.
इलाही जमादार हे महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे.
इलाही जमादार यांनी लिहिलेल्या मराठीतील काही गझल आणि कवितांचा हा संग्रह…
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही
दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा
मुक्तक
व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी
नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग ‘इलाही’ सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे