
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी सुरू केलेल्या पाईपलाईनचा कॉक काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात शेतकर्यावर कोयत्याने वार करून बेदम मारहाण केल्याची घटना जेऊर जवळील ससेवाडी येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गंभीर दुखापत आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी ससे (वय 55, रा. सिटीझन कॉलनी, भिंगार) हे पत्नीसह ससेवाडी येथील शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. मोटार चालू करूनही शेतात पाणी येत नसल्याने त्यांनी पाहिले असता पाईपलाईनचा कॉक काढलेला दिसला. संभाजी ससे यांनी नातू निखिल प्रकाश झरेकर (रा. डोंगरगण) याला कॉक जोडून देण्यास सांगितले. यावर निखिल याने वाद घातला. त्यानंतर संभाजी यांचा भाऊ आदिनाथ ससे, पुतण्या दत्तप्रसाद ससे, उषा ससे (सर्व रा. ससेवाडी, जेऊर) आणि दिव्या स्वप्नील शिंदे (रा. मिरीमाका, पाथर्डी) हे त्या ठिकाणी आले.
यावेळी दत्तप्रसाद ससे याने शिवीगाळ करत जवळच पडलेला कोयता उचलून संभाजी ससे यांच्या कपाळावर मारला. तसेच आदिनाथ व दत्तप्रसाद यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या त्यांच्या नातेवाईक महिलेलाही निखिल, उषा आणि दिव्या यांनी मारहाण केली. या हल्ल्यात संभाजी ससे जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी निखिल झरेकर, आदिनाथ ससे, दत्तप्रसाद ससे, उषा ससे आणि दिव्या शिंदे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.




