पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
पांढर्या सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून येत आहे. सध्या कापसाचा भाव सरासरी 7 ते 7 हजार 100 रुपयांदरम्यान आहे. काही ठिकाणी सरासरी भाव 7 हजार 500 रुपयापर्यंत गेला आहे. शेतकर्यांनी अफवावर विश्वास न ठेवता गरजेनुसार बाजाराकडे लक्ष ठेऊन, टप्प्या-टप्याने कापसाची विक्री करावी, असासल्ला शेतीविषयक जुनी जाणकार मंडळींनी दिला आहे.
शेतकर्यांनी शक्यतो हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विक्री करू नये. सध्या बाजारात कापसाची आवक उत्तम आहे. भावात आणखी सुधारणा होऊ शकते. दोन-तीन महिन्यांत भावात चांगली सुधारणा होण्यास पोषक स्थिती आहे. कापसातील आर्द्रता कमी झाली, गुणवत्ताही चांगली असून, सीसीआय देखील कापसाची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजाराला हमीभावाचा एक आधार निर्माण झाला आहे. बाजारातील सध्याचा सरासरी भाव 7 हजारांच्या पुढे दिसतो. मागील आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या भावात 200 रुपयांनी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे बाजारातील आवकही वाढत आहे. म्हणजेच आवक वाढत असतानाच कापसाचा भावही, वाढत जाणार आहे.
सध्या बाजारात कापसाची आवक शिगेला पोहचली असून गाठीची आवक 2 लाखांच्या टप्प्यात आहे. कापासाच्या दरातही सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. यामागे उत्तम प्रतीचा कापसाची आवक होत असल्याने यात वाढ होत आहे. तर सीसीआय बाजारात कापूस खरेदीत उतरलेले आहे. मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा अधिक होता. पावसात भिजलेला कापूस होता. त्यामुळे गुणवत्ता कमी होती, हा कापूस सीसीआयने खरेदी केला नाही. पण आता जवळपास साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे वाळलेला आहे. त्यातील ओलावा निघून गेला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांकडेे चांगल्या दर्जाचा कापूस उपलब्ध आहे.