अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 15 डिसेंबर या शेवटच्या तारखेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 लाख 35 हजार 552 शेतकर्यांनी सहभाग नोंदवून आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यांचे 5 लाख 30 हजार 490 पीक विमा अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे सरकारच्या विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील रब्बी हंगामातील 2 लाख 87 हजार 785 हेक्टरवरील पीक क्षेत्र संरक्षीत झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारच्यावतीने शेतकर्यांना 1 रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून त्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होताना दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या प्रमुख पिकांचा विमा शेतकर्यांकडून उतरविण्यात आला आहे. चालू हंगामात 2 लाख 35 हजार 552 शेतकर्यांनी विमा उतरविण्यासाठी 5 लाख 30 हजार 490 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 7 हजार 938 कर्जदार तर 5 लाख 22 हजार 552 बिगरकर्जदार अर्जाचा समावेश आहे. सर्वाधिक पारनेर तालुक्यातील 28 हजार 765 शेतकर्यांनी विमा उतरवितला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील 25 हजार 311, नेवासा 22 हजार 729, राहुरी 21 हजार 477 शेतकर्यांनी या योजनेत सहभागी होत पीक विमा उतरविला आहे. श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा, अकोले, कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांचा या योजनेत सहभाग कमी असल्याचे दिसून आले आहे.
पीक विमा उतरविलेल्या शेतकर्यांची तालुकानिहाय संख्या व कंसात हेक्टरी क्षेत्र पुढील प्रमाणे –
अकोले 11,037 (15,869)
जामखेड 19,547 (28,315)
कर्जत 15,765 (20,367.)
कोपरगाव 12,285 (14,444)
नगर 13,137 (19,173)
नेवासा 22,729 (25,180)
पारनेर 28,765 (37,900)
पाथर्डी 21,862 (25,656)
राहाता 12,029 (14,371)
राहुरी 21,477 (21,966)
संगमनेर 25,311 (28067)
शेवगाव 10,535 (12,715)
श्रीगोंदा 11,131 (12,286)
श्रीरामपूर 9,942 (11,467)