Saturday, January 24, 2026
HomeनगरAhilyanagar : लालफितीचा कारभाराने वाढवली नुकसान भरपाईची डोकेदुखी

Ahilyanagar : लालफितीचा कारभाराने वाढवली नुकसान भरपाईची डोकेदुखी

अतिवृष्टीच्या नुकसानीची माहिती पुन्हा फोड करून मागवली || महसूलसह कृषीचा ताप वाढला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली. यासाठी महसूल, कृषीसह अन्य शासकीय यंत्रणांकडून युध्दपातळीवर पंचनामे करण्यात आले. परंतू ऐनवेळी अंतिम अहवाल सादर होण्यापूर्वी राज्य सरकारने महसूल व कृषी विभागाला नुकसानीचे दोन टप्प्यात वर्गीकरण करण्यास सांगितले. यामुळे ऐनवेळी महसूल, कृषी विभागाची धांदल उडली असून यामुळे दिवाळीपूर्वी नगरसह राज्यातील अतिवृष्टी आणि पूराने बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

सप्टेंबर महिन्यांत राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसलेला आहे. या जादाच्या आणि सततच्या पावसाने शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील पिकांसह फळबाग, पूशधन, जनावरांचे गोठे, शेत जमीनी, शेती पाण्याच्या विहीरींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेकडून पंचनामे सुरू असून शेती पिकांचे पंचनामे महसूल आणि कृषी विभाग करत आहे. यापूर्वीच्या प्रचलित पध्दतीने हे पंचनामे धावपळ करून पूर्ण झाल्यावर आता बुधवारी सायंकाळी उशीरापरत सरकार पातळीवरून नुकसान झालेल्या शेती पिकांचे शुन्य ते 2 हेक्टर आणि 2 हेक्टर ते 3 हेक्टर असे स्वतंत्र वर्गीकरण करून माहिती मागवण्यात आली आहे.

YouTube video player

यामुळे शासकीय विभागाने यापूर्वीच्या प्रचलित पध्दतीने तयार केलेली माहितीची पुन्हा फोड करण्याची वेळ आली आहे. हे काम जिल्हा पातळीवर शक्य नसल्याने पुन्हा गाव पातळीपासून या माहितीच खातरजमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यासाठी गुरुवारी दिवसभर गावोगावी आणि तालुक्याच्या ठिकाणी पंचनामे आणि नुकसानीची माहिती संकलित करणार्‍या यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. राज्य सरकारने नगरसह राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी 31 हजार 628 कोटींची मदत जाहीर केलेली आहे.

प्रचलित कार्यपद्धतीनुसार आधी दोन हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली जात होती. परंतु यावेळी शासनाने दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत केली आहे. ही मर्यादा वाढवतांना मदतीचे प्रस्ताव फोडून द्यावे, असे शासनाकडून कळवण्यात आले नव्हते. मात्र, 13 सप्टेंबरला याबाबतचे सुधारित आदेश काढण्यात आले आहेत. हे आदेश जिल्हा पातळीवर बुधवारी सांयकाळी उशीरा प्राप्त झाले आहेत. यात नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती शून्य ते दोन हेक्टर व दोन ते तीन हेक्टर असे स्वतंत्र वर्गीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात नगर जिल्ह्यात 1 हजार 360 गावातील 8 लाख 37 हजार 955 शेतकर्‍यांचे 5 लाख 7 हजार 292 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून 100 टक्के पंचनामे झाले होते. याबाबतचा अहवाल कृषी व महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता. परंतु जिल्हा प्रशासनाला नवीन आदेश प्राप्त झाला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे 0 ते 2 हेक्टर व 2 ते 3 हेक्टर असे वर्गीकरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे वर्गीकरण करण्यास महसूल व कृषी विभागाचे अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मदत मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

अशी मिळणार शेतकर्‍यांना मदत (प्रति हेक्टर)
कोरडवाहू – 18 हजार 500
हंगामी बागायतदार – 27 हजार
कायम बागायती शेतकरी – 32 हजार 500
बियाणे व इतर कामांसाठी – 10 हजार
पीक विमा उतरवलेले शेतकरी – 17 हजार (विम्यातून)


दिवाळी सण ऐन तोंडावर आला आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन असून त्यापूर्वी नूकसानीची माहिती तालुका पातळीवरुन जिल्हा आणि जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर सादर न झाल्यास संबंधीत अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना मदत कशी मिळणार असा प्रश्न आहे. आज शनिवार असून उद्या रविवार आहे. त्यानंतर सामेवारी नरक चतुर्दशी असून दिवाळी सुरू होणार आहे. यामुळे आज आणि उद्या पुन्हा शासनच्या मागणीनूसार नुकसानीची माहिती महसूल, कृषीसह अन्य शासकीय विभागाला सरकारला सादर करावी लागणार आहे. अन्यथा शेतकर्‍यांना दिवाळीत मदत अशक्य असल्याचे चित्र आहे.

सरकट पंचनामे नाहीच
मुख्यमंत्री यांच्यासह पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकर्‍यांच्या पिकांचे सरकट पंचनामे करण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात झालेल्या पंचनाम्यात सरकट पंचनामे झालेले नाहीत. शेतकर्‍यांचे अतिवृष्टी व पूरात सोयाबीन, ऊस, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल, मका, कापूस, बाजरी, केळी, फुल पिके, चारापिके, फळपिके, लिंबू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. विशेष करून दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव- पाथर्डी, कर्जत, जामखेड, नगर या तालुक्यातील नदी पात्रा शेजारी असणार्‍या क्षेत्रातील शेत जमीनी पूर्णपणे वाहून गेलेली आहे. यामुळे सरकारकडून या शेतकर्‍यांना कसा दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...