पालखेड मिरचीचे। वार्ताहर Palkhed Mirchiche
निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील एका शेतकर्यावर सकाळी 8 वाजता बिबट्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आहेरगाव-पालखेड मिरची रस्त्यावरील परिसरात राहणारे दत्तात्रय पुंजा रसाळ हे आपल्या द्राक्षबागेच्या गल्लीमधून चालले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे दत्तात्रय रसाळ यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. रसाळ यांना पुढील उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या सर्व घडामोडींवर येथील द्राक्ष निर्यातदार तथा काकासाहेब वाघ कायम हंगामी पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम रसाळ यांनी दै. ‘देशदूत’च्या माध्यमातून वनविभागाला विनंती केली आहे की, या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्याने परिसरातील मांजर, कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. आता शाळा उघडल्याने लहान बालके व मुले शाळेत जाण्यासाठी तयारी करत असताना बिबट्याच्या धाकाने लहान मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.