Monday, June 24, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना खरिपाची सरसकट नुकसान भरपाई द्या

शेतकर्‍यांना खरिपाची सरसकट नुकसान भरपाई द्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

तालुक्यातील खरिपाची होळी झाली आहे. शेतकरी हैराण झाला असून त्याला वाचविण्यासाठी आता सरकारला पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. खरीप नुकसानीसाठी शासकीय पातळीवरून तातडीने हालचाल करणे गरजेचे बनले आहे. आता सरकारने कुठलाही पंचनामा न करता व अटी-शर्ती न लावता सरसकट प्रथम पंचवीस टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस यांच्यासह शेतकर्‍यांनी सरकारकडे केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील खरीप पिकांची होळी झाली आहे. शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकर्‍यांना पिण्यासह शेतीची चिंता पडली आहे. जनावरांचा चारा कसा उपलब्ध करायचा याची चिंता लागून राहिली आहे. अनेकांनी कर्ज उचलून खरिपातील पिकांची उभारणी केली असताना त्याची परतफेड कशी करायची याची चिंता आहे. तालुक्यातील गोदावरी कालव्यांना पाणी असूनही ते शेतकर्‍यांच्या शेतात पोहचले नाही. त्याबाबत शेतकर्‍यांनी टाकळी येथे कुलूप तोडो आंदोलन करूनही त्याचा जलसंपदा विभाग आणि त्यांच्या अधिकारी वर्गावर काडीचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे डोळ्यादेखत पाणी वाहत असताना पिके जळताना पाहण्याचा न भूतो असा अनुभव शेतकर्‍यांना आला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग धास्तावला आहे. आता केवळ पशुधन कसे वाचवायचे याची चिंता त्यांना आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने म्हटले आहे, राज्य सरकारने शेतकर्‍यांना दुष्काळी संकटातून वाचविण्यासाठी एक रुपयांत शेतकर्‍यांना विमा काढण्याचे काम केले आहे. यात सरासरी सात वर्षांच्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार पिकनिहाय व मंडळ निहाय विम्याची 25 टक्के आगाऊ पीक विमा रक्कम देण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी पुणे यांना आदेश केले आहे. परंतु परिस्थिती यापेक्षा वाईट असून ऑगस्ट महिन्यात महिनाभर पाऊस गायब होता. त्यामुळे सगळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातून कुठलेही उत्पादन शक्य नाही. त्यामुळे त्याचा खर्च निघणे अवघड बनले आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 80 टक्के उत्पादकता घटणार आहे. मात्र त्यात पूर्ण तथ्य नाही. शेतकर्‍याला झालेला खर्च निघणे अवघड आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पूर्ण रक्कम मिळणे गरजेचे आहे. कुठलाही पंचनामा न करता सरकारने कुठल्याही अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी सत्तर हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुषार विध्वंस, पद्मकांत कुदळे, प्रवीण शिंदे, संतोष गंगवाल, अ‍ॅड. नितीन पोळ, अनिल शेवते, नरेंद्र गिरमे, सदाशिव रासकर, नंदकुमार बोरावके आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या