अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोल्हेवाडी (ता. अहिल्यानगर) गावातील रहिवासी व शेतकरी रवींद्र रामराव शेळके (वय 38) यांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. या काळात त्यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली गेली आणि बळजबरीने नोटरीवर सह्या करून घेतल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरचे माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यासह नऊजणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी (19 मे) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक कळमकर, मच्छिंद्र झेंडे, लालू उर्फ अभिषेक जगताप, लोखंडे मावशी (पूर्ण नावे माहिती नाही) व अनोळखी पाच व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र शेळके यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 12 मे रोजी दुपारी तीन वाजता मी माझ्या दुचाकी (एमएच 16 डीएफ 6998) वरून वाकोडीला (ता. अहिल्यानगर) जात असताना मुठ्ठी चौक, सोलापूर रस्त्यावर टोयोटा कंपनीच्या एमएच 16 डीएफ 4447 क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या कारमधील व्यक्तींनी मला कारमध्ये जबरदस्तीने बसवले.
कार मधून खाली उतरलेली एक व्यक्ती माझी दुचाकी घेऊन कारमागे आली. त्या कारमध्ये एकूण पाच अनोळखी लोक होते. त्यांनी मला चिखली (ता. श्रीगोंदा) येथील मच्छिंद्र झेंडे याच्या बंगल्यावर नेले. तेथे झेंडे याने मला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर अनोळखी पाच लोकांनीही मला मारहाण केली. त्यानंतर मला मोबाईलवरून पत्नीला फोन करून खोटं सांगायला लावलं की, मी सचिन सोनवणे यांच्यासोबत बाहेरगावी चाललो आहे. त्यानंतर माझा मोबाईल काढून घेतला गेला आणि जनावरांच्या गोठ्यात डांबून ठेवण्यात आलं. यानंतर मला जबरदस्तीने दुसरा टी-शर्ट घालायला लावून एका व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये झेंडेंनी सांगितल्याप्रमाणे बोलायला लावले.
शेळके यांनी अधिक सांगितले की, सायंकाळी सहा वाजता अभिषेक कळमकर आणि लालू जगताप आले आणि त्यांनीही मला मारहाण केली. पैसे दे, नाहीतर तुला ठार मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर मला नगर-दौंड रस्त्यावर सायंतारा हॉटेलमध्ये नेऊन एका महिलेबरोबर फोटो काढले गेले. दुसर्या दिवशी, 13 मे रोजी, जुन्या कोर्टासमोर बळजबरीने नऊ नोटरीवर सह्या घेतल्या. जर सह्या केल्या नाहीत, तर हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर एका लोखंडे मावशी नावाच्या महिलेने मला तिच्या मुलींसोबत फोटो काढायला लावले व माझ्या भावाला फोन करून सांगितले की, तुझ्या भावाने माझ्या मुलींची छेड काढली आहे, लवकर या, विषय मिटवू. नंतर मला प्रवीण हॉटेल मध्ये ठेवण्यात आले. 17 मे रोजी पहाटे चार वाजता माझ्या सासुरवाडीला सोडण्यात आले. या प्रकरणी अपहरण, मारहाण, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच मच्छिंद्र झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादाभाऊंवर अदखलपात्र गुन्हा
दरम्यान, रवींद्र शेळके यांचा भाऊ पोपट रामराव शेळके (वय 45) यांनी सोमवारी (19 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर व मच्छिंद्र झेंडे यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक कळमकर यांनी तक्रारदार यांना फोन करून त्यांच्या घरी बोलून घेतले. तक्रारदार 14 मे रोजी सायंकाळी कळमकर यांच्या घरी गेले असता दादाभाऊ, अभिषेक व मच्छिंद्र त्यांना म्हणाले, ‘तुझ्या भाऊ रवींद्र शेळके याने आमचे नुकसान केले आहे. पैसे दे नाहीतर तुझी शेत जमिन विक व माझी भरपाई करून दे’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.