नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa
नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील शेतकर्याने दि. 21 रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. एकाच आठवड्यात शेतकरी आत्महत्येची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोंबळ (वय 49 वर्षे) या शेतकर्याने वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खत आणि औषधे घ्यायला पैसे नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
शेतकरी आत्महत्येमुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसात शेतकरी आत्महत्येची ही तालुक्यातील दुसरी घटना आहे. 17 ऑगस्ट रोजी वडूले येथील शेतकर्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर गोयगव्हाणच्या या शेतकर्याने जीवन संपवले. कै. नानासाहेब ठोंबळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे. ठोंबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी करुन पैसे काढत अंत्यसंस्कार केल्याचे प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सांगितले. ही आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेला बळी असल्याचा आरोप प्रहारने केला आहे.





