मुंबई | Mumbai
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता डिलिमीटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्याची तयारी आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून होणार आहे. त्याच अनुशंगाने राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने व्हिप जारी केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. पक्षाच्या सर्व खासदारांना २९ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्लीत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले असून, ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिंदे शिवसेनेचा खासदारांना स्पष्ट आदेश
शिवसेनेचे मुख्य प्रतोद श्रीरंग बारणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी खासदारांना व्हिप जारी केला. या पत्रात संसदेच्या विशेष अधिवेशनातील कामकाज अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत सर्व खासदारांनी उपस्थिती सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. खासदारांनी २९ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्लीत पोहोचावे आणि विशेष अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावे, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेत १३ खासदार असून राज्यसभेत दोन खासदार आहेत. त्यामुळे आगामी अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि खासदारांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.
लोकसभेतील खासदारांची संख्या वाढणार; डिलिमीटेशन म्हणजे नेमक काय, एनडीएला किती खासदारांचा हवा पाठिंबा?
२८ नोव्हेंबरला मुंबईत खासदारांची बैठक
विशेष अधिवेशनापूर्वी शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनातील कामकाज, पक्षाची भूमिका आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही जारी केला व्हिप
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही आपल्या लोकसभा खासदारांना व्हिप जारी केला होता. पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्व आठ खासदारांना ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सभागृहात महत्त्वाचे विषय चर्चेला येणार असल्याने खासदारांनी कोणत्याही परिस्थितीत अनुपस्थित राहू नये आणि पक्षाची भूमिका समर्थित करावी, असे व्हिपमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणावर लक्ष
संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमीटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित प्रस्तावित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे लोकसभेच्या सदस्यसंख्येत वाढ होण्याची चर्चा सुरू असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून खासदारांना व्हिप जारी केला जात असल्याने विशेष अधिवेशनातील मतदान, पक्षांची भूमिका आणि राजकीय समीकरणे याकडे देशाचे लक्ष लागले आहे.




