Friday, September 20, 2024
Homeनगरनांदुर मधमेश्वर पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

नांदुर मधमेश्वर पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

- Advertisement -

नांदूर मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने शनिवारी उग्र रुप धारण केले. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी घेण्यासाठी सकाळी वैजापूर येथून निघालेल्या शेकडो शेतकर्‍यांना येवला पोलिसांनी अडवले. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले. हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकर्‍यांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर गंगापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी तातडीने येवला येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

दरम्यान, आधार समितीचे पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलक जलसमाधी आंदोलन करण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातील पाण्यात उतरले होते. आंदोलक व नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्यात चर्चेच्या फेर्‍या जवळपास दोन तास सुरु होत्या. पाणी कधी सोडणार याबाबत निश्चित तारीख द्या यावर आंदोलक ठाम होते. अखेर विभागाने शासन पाणी सोडण्याबाबत सकारात्मक असल्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलक मागे घेतले.
मागील साडेचार वर्षांच्या काळात नांदूर मधमेश्वर कालव्यातून चौदा वेळा तारखेनुसार आवर्तन सोडले असून पंधरावे आवर्तन मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली, व वाकी ही धरणे वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी असून या धरणातून अकरा टीएमसी पाण्यापैकी बाष्पीभवन व वहन व्यय वगळता साडे सहा टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित असताना नाशिका पाटबंधारे विभागाने वर्षात तीन आवर्तनातून साडे चार टीएमसी पाणी मिळण्यासाठी होकार दिला असून उन्हाळी आवर्तनातून 1.26 टीएमसी पाणी मिळण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. शासनाने सकारात्मकता दाखवाळ्यामुळे पाणी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पाणी तापलं आहे. नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या वैजापूर, गंगापूर येथील महिला, पुरुष शेतकर्‍यांना पोलिसांनी येवल्यात ताब्यात घेतले आहे.नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील दोनशेहून अधिक महिला आणि पुरुष शेतकरी आक्रमक झाले आहे. उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने नांदूर मधमेश्वर धरणातच जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकर्‍यांना येवला लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या