Friday, December 13, 2024
Homeनगरगोदावरी कालव्यांचे पाणी वैजापूर, गंगापूरला दिल्याने शेतकरी आक्रमक

गोदावरी कालव्यांचे पाणी वैजापूर, गंगापूरला दिल्याने शेतकरी आक्रमक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी कालव्यांचे पाणी कमी करुन वैजापूर, गंगापूर तालुक्यासाठी असणार्‍या जलद कालव्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्याने संतप्त लाभधारक शेतकर्‍यांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला. या भावनांचे निवेदन आज मंगळवार दि. 28 रोजी जलसंपदा विभागाच्या कार्यालयांना देण्यात येणार आहे. गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पोहेगापासून तर जळगाव या अंतरातील विविध गावांतील शेतकरी काल सायंकाळी साकुरी येथील सिध्द संकल्प मंगलकार्यालयात एकत्र आले. जलसंपदा विभागाने उशीरा का होईना सोडलेले बिगर सिंचनाचे व सिंचनाचे आवर्तन सुरु असताना अचानक जलद कालव्याला पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिला.

- Advertisement -

त्या आदेशान्वये 800 दलघफू पाणी जलद कालव्याला सोडणे सुरु झाले आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही कालव्यांची पाणी कपात करून ते पाणी जलद कालव्याला देण्यात येत असल्याने अचानक पाण्यावर मारलेल्या डल्ल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. त्यामुळे काल याबाबत निषेध बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यात शेतकरी, नेते मंडळी एकत्र येतात मात्र येथे असे घडत नाही? त्यामुळे राहाता, कोपरगाव तालुका पाणी प्रश्नावरच घिरट्या घालत आहे. या बैठकीत जलसंपदा विभागाला निषेधाचे निवेदन आज मंगळवारी सकाळी 11 वाजता देण्याचे ठरविण्यात आले. तसेच नांदूरमधमेश्वर बंधार्‍याला बसविण्यात येणार्‍या वक्राकार दरवाज्यांना विरोध करणे, वैतरणेचे पाणी लवकर मिळावे, गोदावरी कालवा रुंदीकरण हे विषय यावेळी चर्चेत होते. त्याविषयी निवेदने देण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी गणेशचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले, माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, कॉ. राजेंद्र बावके, राजेंद्र कार्ले, रावसाहेब गाढवे, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, संजय सदाफळ, सचिन चौधरी, दिलीप रोहोम, शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके, विनायकराव दंडवते, भगवानराव टिळेकर, भानुदास गाडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस गणेशचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते, शिवाजीराव लहारे, नानासाहेब बोठे, अ‍ॅड. विजय बोरकर, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, बाळासाहेब गाढवे, संजय शेळके, मच्छिंद्र चौधरी, दिलीप चौधरी,अनिल बोठे, सुधाकर बोठे, रविंद्र मेहेत्रे, महेश औताडे, विजय चौधरी, ज्ञानदेव शेळके, रावसाहेब आदमाने, सुनील सदाफळ, अविनाश टिळेकर, अनिल बावके, सुरेश गाडेकर, आर. बी. चोळके, भारत गोर्डे, भाऊसाहेब चौधरी, बाबासाहेब लांडगे, कैलास मेहेत्रे, अण्णासाहेब मेहेत्रे, बद्रीनाथ सदाफळ, ज्ञानेश्वर सदाफळ, रामदास सदाफळ, अशोक कापरे, दत्तात्रय लहारे, आसाराम राशिनकर, बाळासाहेब निर्मळ, मच्छिंद्र चौधरी, बाजीराव गाढवे, अ‍ॅड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, दिलीप चौधरी, रविंद्र बोठे, तुषार गाढवे, हरिभाउ चोळके, रतन त्रिभुवन, प्रविण सदाफळ, मधुकर औताडे, विठ्ठल औताडे, निवृत्ती औताडे, आप्पासाहेब औताडे, चंद्रकांत औताडे, विलास शेळके यांच्यासह अन्य लाभधारक उपस्थित होते.

विखे, काळे, कोल्हे यांनी एकत्र यावे!
या बैठकीत गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी विखे- काळे- कोल्हे यांनी एकत्र यावे असा या बैठकीचा सूर होता. मराठवाड्यातील शेतकरी, तेथील नेतेमंडळी पाणी प्रश्नी एकत्र येतात. मग कोपरगाव, राहाता तालुक्यातील नेते मंडळी का एकत्र येत नाही. या मंडळींना एकत्र आणून गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा, असा सूर बैठकीत होता.

दुष्काळातून शेतकर्‍यांना वाचवा
गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यालय नाशिकला आणा, वक्राकार दरवाजांना विरोध करा, चालु आवर्तन सलग सुरु ठेवा यासाठी गोदावरीच्या कालव्यांना पाणी द्या, उभी पिके धोक्यात आहेत. मागील हंगामात वाचवून ठेवलेले पाणी पिण्याच्या नावाखाली पळविले जात आहे. जलसंपदाने व्यवस्थित नियोजन करावे, म्हणजे असा फटका शेतीला बसणार नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना वाचवा यासाठी निवेदने द्या, प्रसंगी आंदोलनही उभारु.
– अ‍ॅड. नारायणराव कार्ले पाटील, माजी चेअरमन व संचालक गणेश कारखाना

पिके जळतील, मृतसाठ्यातून आम्हालाही पाणी द्या!
राहाता तालुक्यातील विशेष करुन गणेश परिसरात दुष्काळाच्या खाईत आहे. उभी पिके जळुन चालली. आमचे पाणी दुसरीकडे वळविल्याने आमची पिके जळतील. दोन्ही तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येवून यावर कायमचा तोडगा काढावा, अन्यथा शेतकरी आक्रमक होतील.
– मुकूंदराव सदाफळ पाटील, माजी चेअरमन, गणेश कारखाना

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या